पणजी : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, कसोटी क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज आणि ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचा मुख्य शिल्पकार अजिंक्य रहाणे याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. सोशल मीडियावर एका भावुक व्हिडिओ संदेशाद्वारे आणि पोस्टद्वारे त्याने आपल्या प्रदीर्घ आणि चमकदार कारकिर्दीला पूर्णविराम दिला. अजिंक्यच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात एका अत्यंत शांत, संयमी आणि निष्ठावान खेळाडूच्या अध्यायाचा औपचारिक अंत झाला आहे.

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य रहाणेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, यात त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो म्हणाला, आयुष्याचे एक साधे सत्य आहे की प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि एका क्षणी त्याचा अंतही होतो. जेव्हा ती वेळ येते, तेव्हा आपण त्याचा आदर करून पुढे गेले पाहिजे. मी माझ्या फलंदाजीत नेहमीच टायमिंगवर विश्वास ठेवला आहे आणि त्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. आज मला असे वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि सर्व प्रकारच्या स्पर्धांमधून पुढे जाण्याची आणि निवृत्ती जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारतीय क्रिकेटचा कॅप नंबर २७८ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्यने आपल्या चाहत्यांचे आभार मानताना सांगितले की, अजिंक्य या शब्दाचा अर्थ ज्याचा कुणीही पराभव करू शकत अशी व्यक्ती असा होतो, परंतु क्रिकेटने मला अनेकदा पराभव दाखवला. आम्ही सामने गमावले, मी चुका केल्या, पण एक जागा अशी होती जिथे माझा कधीच पराभव झाला नाही, ती म्हणजे तुमच्या सर्वांच्या हृदयात!
डोंबिवलीच्या सामान्य कुटुंबातून आलेल्या अजिंक्य रहाणेचा भारतीय संघापर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षाचा आणि प्रेरणादायी राहिला आहे. बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना अजिंक्य म्हणाला, डोंबिवलीहून केवळ सरावासाठी मुंबईच्या स्थानिक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका लहान मुलापासून ते भारतीय संघाची टोपी परिधान करण्यापर्यंतचा हा प्रवास स्वप्नवत होता. मी या खेळाला माझे सर्वस्व दिले. प्रत्येक दिवशी, प्रत्येक डावात आणि फलंदाजीच्या प्रत्येक संधीमध्ये माझ्या देशाचे नाव उंचावणे हेच माझे ध्येय होते. मी नेहमीच संघाला आणि देशाला स्वतःपेक्षा पुढे ठेवले. अत्यंत प्रामाणिकपणे खेळलेला हा खेळ तुम्हाला नक्कीच काहीतरी देऊन जातो, यावर माझा विश्वास होता.
अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीतील सर्वात सुवर्ण क्षण म्हणजे २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळली गेलेली बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका ठरली. ॲडलेड येथील पहिल्या कसोटीत भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर गारद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि अनेक महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतींनंतरही अजिंक्यने आपल्या अत्यंत शांत, संयमी आणि आक्रमक रणनीतीच्या जोरावर भारतीय संघाचे नेतृत्व केले. मेलबर्नमध्ये शानदार शतक ठोकत त्याने संघाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला आणि अखेर भारताने ती मालिका २-१ अशी जिंकून इतिहास रचला. भारताचा एक यशस्वी कर्णधार म्हणून अजिंक्यने सहा कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले, ज्यापैकी चार सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला, तर दोन सामने अनिर्णित राहिले.

सन २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच कसोटी पदार्पण करणाऱ्या अजिंक्यने पुढे जाऊन भारतीय कसोटी संघाच्या मधल्या फळीचा भक्कम कणा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्याने भारतासाठी ८५ कसोटी सामन्यांमध्ये ३८.४६ च्या सरासरीने ५,०७७ धावा केल्या. यामध्ये १२ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे परदेशी भूमीवर भारतीय संघाचा 'संकटमोचक' म्हणून अजिंक्यची मोठी ख्याती होती. त्याच्या १२ कसोटी शतकांपैकी आठ शतके ही भारताबाहेर झाली आहेत. यात इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी एक, तर श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमध्ये प्रत्येकी दोन शतकांचा समावेश आहे.

कसोटीशिवाय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही अजिंक्यने भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये २,९६२ धावा आणि २० टी-२० सामन्यांमध्ये ३७५ धावा केल्या. २०१४ चा टी-२० विश्वचषक आणि २०१५ चा ५० षटकांचा विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय संघात त्याचा समावेश होता. सन २०१८ मध्ये तो आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. आयपीएलमध्येही त्याचा प्रदीर्घ अनुभव राहिला असून २००८ च्या पहिल्या हंगामापासून २०२६ पर्यंत त्याने तब्बल २१२ सामने खेळताना ५,३६७ धावा कुटल्या. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना २०१२ मध्ये त्याने ५६० धावा, तर २०१५ मध्ये ५०० हून अधिक धावा केल्या होत्या. २०२६ च्या हंगामात त्याने कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करताना ३३५ धावा केल्या होत्या.

अजिंक्य रहाणेच्या या निर्णयावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अजिंक्य रहाणेची निवृत्ती हा भारतीय क्रिकेटमधील एका सुवर्ण अध्यायाचा अंत आहे. त्याचे समर्पण, कठीण प्रसंगात दाखवलेला संयम आणि उत्कृष्टतेप्रती असलेली निष्ठा यांमुळे तो मुंबई क्रिकेटचा सर्वात महान रुग्ण आणि दूत बनला आहे. त्याचा वारसा येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. निवृत्तीनंतरही आपण क्रिकेट या खेळापासून दूर जाणार नसून नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि या खेळाने दिलेले परत करण्यासाठी कायम तत्पर राहू, असा निर्धार अजिंक्यने व्यक्त केला आहे.


