अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक ३२ खेळाडू, अनेक प्रमुख खेळ वगळण्याने संख्या घटली

नवी दिल्ली : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे येत्या २३ जुलै २०२६ पासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपल्या १२५ सदस्यीय मजबूत क्रीडा पथकाची अधिकृत घोषणा केली आहे. या पथकात ७७ पुरुष आणि ४८ महिला खेळाडूंचा समावेश असून, भारतीय खेळाडू एकूण १३ क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि बॉक्सिंगपटू लव्हलिना बोरगोहेन यांच्याकडून भारताला सुवर्णपदकांच्या मोठ्या आशा आहेत.
यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक प्रतिनिधित्व अॅथलेटिक्स क्षेत्रात असून, त्यांचे ३२ खेळाडू मैदानात उतरणार आहेत. इतर प्रमुख क्रीडा प्रकारांमध्ये अॅथलेटिक्समध्ये ३२ खेळाडू, बॉक्सिंग (मुष्टीयुद्ध) मध्ये १४ खेळाडू, जुडोमध्ये १४ खेळाडू, वेटलिफ्टिंग (भारोत्तोलन)मध्ये १२ खेळाडूंचा समावेश आहे. टेबल टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती आणि स्कॉश या खेळांचा यंदा ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यात आलेला नाही. याच कारणामुळे २०२२ च्या बर्मिंगहॅम स्पर्धेतील २१० खेळाडूंच्या तुलनेत यंदा भारताचे पथक मर्यादित झाले आहे. (भारताने गेल्या वेळी ६१ पदकांची कमाई केली होती).
प्रमुख खेळाडू आणि त्यांचे क्रीडा प्रकार
अॅथलेटिक्स : पुरुष विभाग (मैदानी व ट्रॅक): नीरज चोप्रा (भालाफेक), रोहित यादव (भालाफेक), यश वीर सिंग (भालाफेक), गुरिंदरवीर सिंग (१०० मी.), अनिकेश कुजूर (२०० मी. - भारताचा सर्वात वेगवान धावपटू), गुलवीर सिंह (५००० व १०००० मी.), तेजस्विन शंकर (उंच उडी व डेकॅथलॉन), मुरली श्रीशंकर (लांब उडी), प्रविण चित्रवेल (त्रहेरी उडी), तजिंदरपाल सिंग तूर (गोळाफेक).
महिला विभाग: पारुल चौधरी (३००० मी. स्टीपलचेस व ५००० मी.), प्रियंका गोस्वामी (१०,००० मी. चालणे), रवीन गायकवाड (१०,००० मी. चालणे), सीमा कालिरामण (थाळीफेक), पूजा सिंग (उंच उडी).
पॅरा अॅथलेटिक्स: श्रेयंश त्रिवेदी, दिलीप महादू गावित (१०० मी.), सोमण राणा (गोळाफेक), शर्मिला धनखर (गोळाफेक).
वेटलिफ्टिंग : महिला विभाग: मिराबाई चानू (४८ किलो गट - सुवर्णपदक दावेदार), बिंद्याराणी देवी (५८ किलो गट), हरजिंदर कौर (६९ किलो गट).
पुरुष विभाग: ऋषिकांत सिंग (६० किलो गट), लवप्रीत सिंग (११०+ किलो गट).
बॉक्सिंग : महिला विभाग: लव्हलिना बोरगोहेन (७५ किलो गट - ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती), प्रीती पवार (५४ किलो गट), जास्मिन लंबोरिया (५७ किलो गट).
पुरुष विभाग: सचिन सिवाच (६० किलो गट), नरेंद्र बेरवाल (९०+ किलो गट).
इतर महत्त्वाचे क्रीडा प्रकार
जिम्नॅस्टिक्स: राष्ट्रीय विजेता तपन मोहंती, सत्यजित मंडल, प्रणती नायक आणि निष्का अग्रवाल.
जलतरण : श्रीहरी नटराज, साजन प्रकाश आणि आर्यन नेहरा.
पॅरा स्विमिंग: सुयश नारायण जाधव, चैतन्य विश्वास कुलकर्णी, स्वातिक पाटील (तेजस नंदकुमार यांनी वर्गीकरण समस्येमुळे माघार घेतली आहे).
लॉन बॉल्स : नयनमोनी सैकिया, रुपा राणी तिर्की, नवनीत सिंग.
ट्रॅक सायकलिंग: रोनाल्डो सिंग लायतोंजम, डेव्हिड बेकहॅम.
३x३ बास्केटबॉल (महिला व्हिलचेअर): रीना रमेशचंद्र गुप्ता, आयरेमबम रितू चानू.
क्रीडा विश्लेषकांच्या मते, काही महत्त्वाचे खेळ वगळले गेले असले तरी, निवडक १३ क्रीडा प्रकारांमध्ये भारताची कामगिरी ऐतिहासिक ठरेल आणि नवोदित खेळाडूंना जागतिक स्तरावर चमकण्याची मोठी संधी मिळेल.