फिफा विश्वचषक २०२६च्या राऊंड ऑफ १६ मध्ये अर्लिंग हालांडच्या दुहेरी गोलच्या जोरावर नॉर्वेने ब्राझीलला नमवले. उपांत्यपूर्व फेरीत केली कूच

वॉशिंग्टन : जागतिक फुटबॉल विश्वातील प्रतिष्ठित आणि कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ब्राझीलच्या नेयमार ज्युनियर याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. न्यू जर्सी येथील मेटलाईफ स्टेडियमवर २०२६ च्या फिफा विश्वचषकातील उपउपांत्यपूर्व फेरीत (राउंड ऑफ १६) नॉर्वेविरुद्ध झालेल्या २-१ अशा धक्कादायक पराभवानंतर ३४ वर्षीय नेयमारने अत्यंत भावूक होऊन हा निर्णय घेतला. ब्राझीलचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर मैदानावरील नेयमारचे अश्रू संपूर्ण जगाने पाहिले.
सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नेयमार म्हणाला की, मी खूप प्रयत्न केले, पण आता हा प्रवास संपला आहे, जिथून मी सुरुवात केली होती, तिथेच आज शेवट करत आहे. त्याच्या या घोषणेने सोशल मीडियावर चाहत्यांच्या भावनांचा बांध फुटला असून जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या किमयागाराला भावपूर्ण निरोप दिला जात आहे.
नेयमारचा हा आंतरराष्ट्रीय निरोप एका पूर्ण वर्तुळासारखा ठरला, कारण २०१० मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने याच मेटलाईफ स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध खेळताना ब्राझीलच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले होते आणि सोळा वर्षांनंतर त्याच मैदानावर त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. नॉर्वेविरुद्धच्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात नेयमार उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याने मिळालेल्या पेन्टलीचा पुरेपूर फायदा घेत ब्राझीलसाठी एकमेव गोल नोंदवला, मात्र नॉर्वेच्या अर्लिंग हालांडने केलेल्या दोन उत्कृष्ट गोल्समुळे ब्राझीलचा पराभव टाळता आला नाही. या पराभवामुळे ब्राझीलचे सहावे विश्वचषक विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न तर भंगलेच, पण एका अद्भुत आणि जादुई खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही संपली.
नेयमार हा ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासातील महान खेळाडू पेले आणि रोनाल्डो यांच्यानंतरचा सर्वात मोठा आयकॉन मानला जातो. त्याच्या खेळण्याची शैली, अंगावर येणाऱ्या डिफेंडर्सना चकवण्याची ड्रिब्लिंगची ताकद आणि मैदानावरील त्याचे ट्रिक्स यामुळे त्याने फुटबॉल चाहत्यांना नेहमीच मंत्रमुग्ध केले. तो ब्राझीलच्या इतिहासातील पुरुषांच्या संघात सर्वाधिक ८० आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने १२९ सामन्यांमध्ये ही कामगिरी करत खुद्द महान पेले यांच्या अधिकृत गोलचा विक्रम मोडीत काढला. याशिवाय तो ब्राझीलचा काहूनंतरचा दुसरा सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. २०१३ ची फिफा कॉन्फेडरेशन कप स्पर्धा जिंकण्यात आणि २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राझीलला स्वतःच्या नेतृत्वात पहिलेवहिले ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देण्यात नेयमारचा वाटा मोलाचा होता, तर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्य पदक पटकावले होते.
असे असले तरी, नेयमारचा हा १६ वर्षांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्याच्या संपूर्ण कारकीर्दीला दुखापतींचे मोठे ग्रहण लागले होते. महत्त्वाच्या स्पर्धांच्या वेळी तो वारंवार जखमी झाला, ज्यामुळे त्याच्या प्रतिभेला मर्यादा पडल्या. या विश्वचषकातही तो दुखापतीतून सावरून कार्लो एन्सेलोटी यांच्या संघात दाखल झाला होता, पण पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याला स्कॉटलंड आणि नॉर्वेविरुद्ध बदली खेळाडू म्हणून खेळावे लागले. दुखापतींशी आणि चाहत्यांच्या प्रचंड अपेक्षांशी झुंज देत त्याने ब्राझीलच्या फुटबॉलला एका दशकाहून अधिक काळ आपल्या खांद्यावर पेलले. विश्वचषक न जिंकता येणारा जगातील सर्वात मोठा खेळाडू म्हणून जरी त्याची नोंद झाली असली, तरी फुटबॉल खेळाला त्याने दिलेले योगदान अतुलनीय राहील.
त्याच्या निवृत्तीच्या बातमीनंतर फुटबॉल विश्वातील अनेक दिग्गजांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. फ्रान्सचा माजी महान खेळाडू थिअरी हेन्री याने सांगितले की, नेयमार हा असा खेळाडू होता ज्याचा खेळ पाहण्यासाठी मी पैसे खर्च केले असते, त्याने संपूर्ण पिढीला फुटबॉलवर प्रेम करायला शिकवले. स्वीडनच्या झ्लाटन इब्राहिमोविचनेही नेयमारच्या प्रतिभेचे कौतुक करत तो युरोपमध्ये आणि ब्राझीलमध्येही अप्रतिम खेळल्याचे आवर्जून सांगितले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाला असला तरी नेयमार २०२५ मध्ये दाखल झालेल्या आपल्या जुन्या 'सांतोस एफसी' या क्लबसाठी व्यावसायिक फुटबॉल खेळणे सुरूच ठेवणार आहे. सोशल मीडियावर तरुण चाहत्यांनी "कदाचित पुढच्या जन्मात तू विश्वचषक जिंकशील" अशा भावनिक ओळी लिहीत या सांबा किंगला मानवंदना दिली आहे.
)