म्हणाले, देश-विदेशात परिचारिकांसाठी मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी

साखळी: गोमंतकीयांनी आपल्या घराच्या जवळ, साखळी किंवा पणजीतच नोकरी करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. परिचारिकांसाठी (नर्सिंग) आता परदेशात तसेच गोव्याबाहेरही मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. गोमंतकीयांनी या संधींचा लाभ घ्यायला हवा,असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी येथील 'साई नर्सिंग इन्स्टिट्यूट'मध्ये आयोजित 'मातोश्री पद्मिनी दिन' कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, केरळमधील परिचारिकांनी परदेशी भाषा आत्मसात करून जगभरातील देशांत नोकरी मिळवली आहे. गोव्यातील परिचारिकांनीही जर्मन आणि इतर परदेशी भाषा शिकणे गरजेचे आहे. नोकरी आणि इतर कामांसाठी परदेशी भाषा येणे आवश्यक ठरते. त्यामुळेच साई नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये जर्मन भाषा शिकण्याचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात बाहेरील विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळेल.
कर्करोगाचे लवकर निदान आणि वेळीच उपचार महत्त्वाचे : मुख्यमंत्री
कार्यक्रमात कर्करोगाविषयी जनजागृती करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले, कर्करोगाचे निदान पहिल्या टप्प्यात होऊन त्यावर वेळीच उपचार सुरू केल्यास रुग्ण १०० टक्के बरा होऊ शकतो. मात्र, अनेक जण दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यावर उपचारास सुरुवात करतात. यामुळे उपचारांना अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. उशिरा उपचार सुरू करणे हेच कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी नियमितपणे आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.