Home >> गोवा >> बसथांबा जमीनदोस्त केल्याने किर्लपाल ग्रामसभेत सरपंच धारेवर

बसथांबा जमीनदोस्त केल्याने किर्लपाल ग्रामसभेत सरपंच धारेवर

ग्रामस्थांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे न मिळाल्याने दोन पंच बसले ग्रामस्थांत

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
05th July, 11:19 pm
बसथांबा जमीनदोस्त केल्याने किर्लपाल ग्रामसभेत सरपंच धारेवर

फोंडा : पंचायत इमारत समोरील कित्येक वर्षांपूर्वी बांधलेला बस थांबा जमीनदोस्त, बेकायदेशीर घरावर पंचायतीतर्फे ठेवलेली नोटीस, भूमिगत वीजवाहिन्या व अन्य विषयांवरून किर्लपाल पंचायतीची ग्रामसभा गाजली. ग्रामसभेत सरपंच दामोदर बांदेकर ग्रामस्थांच्या प्रश्नाला उत्तरे देऊन शकले नसल्यामुळे पंच सदस्य भोला उर्फ बारकेलो गावकर व रमाकांत गावकर यांनी ग्रामस्थांच्या बरोबर बसण्याचा निर्णय घेतला.

किर्लपाल पंचायतीची ग्रामसभा रविवारी सरपंच दामोदर बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पंचायत सचिव प्रसाद शेट, जिल्हा पंचायत सदस्य मोहन गावकर, उपसरपंच कालिदास गावकर, पंच भोला उर्फ बारकेलो गावकर, भानुदास गावकर, रमाकांत गावकर, गटविकास अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी माया खांंडेपारकर व अन्य पंच सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किर्लपाल पंचायतीच्या कार्यालय समोरील रस्त्यावर एका खाण कंपनीने लोकांच्या सोयीसाठी बसथांबा बांधून दिला होता. परंतु, एका महिन्यापूर्वी पंचायतीने कोणाला माहिती न देता बस थांबा जमीनदोस्त केला. त्यामुळे सध्या पावसाळ्यात प्रवाशांना बसची प्रतीक्षा करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला छत्र्या घेऊन उभे राहावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी एका स्थानिक नागरिकाने बसथांबा अज्ञातांनी जमीनदोस्त केल्याची तक्रार दाखल केली होती. सरपंच दामोदर बांदेकर यांनी बसथांबा कोसळण्याच्या मार्गावर असल्याने जमीनदोस्त केला असल्याचे उत्तर ग्रामस्थांना दिले.

पंचायत क्षेत्रातील एका गरीब व्यक्तीला बेकायदेशीर बांधकाम करीत असल्याची नोटीस पंचायततर्फे देण्यात आली. मात्र, अनेक बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध तक्रारी दाखल करुनही पंचायतीतर्फे काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरपंच दामोदर बांदेकर यांनी सुमोटोच्या अंतर्गत नोटीस पाठविण्यात आल्याचे उत्तर दिले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तक्रारी दाखल केलेल्या विरुद्ध सुमोटोच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.

ग्रामस्थांच्या प्रश्नाला उत्तरे देण्यात सरपंच असमर्थ ठरले असल्याचे अॅड. विकास देसाई यांनी सांगितले.

सरपंच दामोदर बांदेकर यांनी पंचायत कार्याल समोर असलेला बस थांबा कोसळण्याच्या मार्गावर असल्याने जमीनदोस्त करण्यात आल्याचे सांगितले. तसेच खनिज वाहतूक करण्यासाठी मोबाईल प्रकल्प सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.

सरपंच, सचिव उशिरा आल्याने नाराजी

ग्रामसभेत पंचायत सचिव आणि सरपंच सकाळी १०.३० वा. सभागृहात हजर झाले. त्यानंतर ग्रामसभा ११ वा. सुरू करण्यात आली. ग्रामसभेचे महत्त्व सरपंचांना नसल्याने उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. 

हेही वाचा
सर्व पहा