दमदार पावसाने शेतकरी सुखावला, तर ‘माझा फ्लॅट’ योजनेमुळे फ्लॅटधारकांना दिलासा

पणजी : या आठवड्यात पाऊस जोरदार पडत असू्त राज्यभरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनांची नोंद झाली. तर, शेतकरी वर्गाला हा पाऊस सुखकारक ठरला आहे. सुर्ला येथील बाराजण धबधब्यावर बेळगावच्या २० वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. गोव्यातील हजारो फ्लॅटधारकांसाठी राज्य सरकारने दिलासादायक पाऊल उचलत ‘माझा फ्लॅट’ योजनेला मंजुरी दिली आहे. याशिवाय फसवणूक, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
ब्रेसलेट चोरल्यावरून मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
सुकूर येथे जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला आनंद पाटील (३७, रा, सुकूर) याचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी खूनाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करून सौरभ नारूलकरसह चौघांना अटक केली आहे. तीन महिन्यांपूर्वी आनंद पाटीलने सौरभचे ब्रेसलेट चोरले होते. त्याचा राग मनात धरून चौघांनी त्याच्यावर हल्ला केला होता.
सुर्ला येथील बाराजण धबधब्यावर युवकाचा बुडून मृत्यू
सुर्ला येथील बाराजण धबधब्यावर रविवारी सायंकाळी बेळगाव येथील २० वर्षीय युवक पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. बाराजण धबधब्यावर रविवारी दुपारी बेळगाव येथील तरुण आंघोळ करण्यासाठी आले होते. धबधब्यावर जाण्यास मज्जाव असूनही वन कर्मचाऱ्यांना न जुमानता सुमारे दीडशे ते दोनशे कर्नाटकातील पर्यटक या धबधब्यावर गेले होते. यावेळी पाण्यात उतरलेल्या आदित्य दीपक कुमार सत्पती (वय २०) या युवकाचा पाण्यात तोल जाऊन तो खोल डोहात बुडाला.
वेर्णा येथे महामार्गावर भरधाव थारचा थरार
वेर्णा येथील महामार्गावर एका थारने क्रेटा कारला व दुचाकीला जोरदार धडक दिली. पावसामुळे रस्त्यावर पाणी जमा झाल्याने आपला वाहनावरील ताबा सुटून सदर अपघात झाल्याचे कारचालकाने सांगितले.
सोमवार
‘वझरा सकला’ धबधब्यावर अडकलेल्या साखळीच्या सहा युवकांची सुटका
विर्डी-दोडामार्ग येथील निसर्गरम्य वझरा सकला धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेले साखळीतील सहा युवक अचानक वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे जंगलात अडकून पडले. सुदैवाने, अग्निशमन दल आणि स्थानिकांनी बचाव मोहीम राबवून सर्वांची सुखरूप सुटका केली.
कांदोळीत अंगठ्या चोरणाऱ्या टोळीला पोलीस कोठडी
कांदोळी येथील उदय गोल्डस्मिथ ज्वेलरी शॉपमधील २२ लाख रुपये किमतीच्या १६ अंगठ्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रायगड (महाराष्ट्र) येथील पाच जणांच्या टोळीला म्हापसा न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सौरभ नारूलकरला पोलीस कोठडी
सुकूर, पर्वरी येथील आनंद पाटील (३७) या तरुणाच्या खून प्रकरणात मुख्य संशयित सौरभ भालचंद्र नारूलकर (३१) याला म्हापसा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्रेसलेट चोरीच्या जुन्या वादातूनच आनंद पाटील याला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवार
फुटबॉल सामन्यात ‘हेडर’ मारताना जखमी युवकाचा मृत्यू
बाणावली येथील दांडो मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल सामन्यादरम्यान ‘हेडर’ मारताना जखमी डायलॉन कार्व्हालो या युवकाचा मृत्यू होण्याची घटना घडली आहे. युनायटेड बॉईज ऑफ आंबावली विरुद्ध गार्डियन एंजल स्पोर्ट्स क्लब कुडचडे यांच्यातील सामन्यादरम्यान हेडर मारण्याचा प्रयत्न करताना आंबावली येथील २६ वर्षीय तरुण डायलॉन नॅथॅलिनो कार्व्हालो हा मैदानात कोसळला होता.
रेवोडा येथे स्वयंअपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
रेवोडा येथे मोटारसायकल रस्त्यावर कोसळल्याने झालेल्या स्वयंअपघातात कुलदीप अजित फडते (२८, रा. फडतेवाडा रेवोडा) या दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. लोकांनी त्याला तत्काळ रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वास्कोत मोठा दगड, तर हळदोण्यात झाड कोसळले
वास्कोतील वोड्डांत परिसरात डोंगरावरून मोठा दगड घसरत येऊन प्रमोदिनी नाईक यांच्या घरावर कोसळला. यामुळे घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. तर, हळदोणा येथे मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे मोठे झाड घराबाहेरील पार्किंग शेडसह दोन वाहनांवर पडल्याने मोठे नुकसान झाले.
दोन फेक कॉल सेंटरमधून ३४ जणांना अटक
बार्देश तालुक्यातील किनारी भागात कळंगुट व हणजूण येथे थाटलेल्या आणि अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या बेकायदा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा स्थानिक पोलिसांनी पदार्फाश केला आहे. या प्रकरणी एकूण ३४ संशयित आरोपींना अटक करून सुमारे ३५ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बुधवार
संदीपच्या मृत्यूप्रकरणी महिलेच्या शोधार्थ पोलीस पथक मंगळुरूला रवाना
कळंगुट येथील रिसॉर्टमध्ये उडुपी (कर्नाटक) येथील वॉटर स्पोर्टस् बोट व्यावसायिक संदीप सुवर्णा (४२) याचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. संदीप हा कर्नाटकातील माजी मंत्र्याचा वाहनचालक आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, संदीपची सोनसाखळी आणि पाकीट गायब असल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयित महिलेच्या शोधार्थ पोलीस पथक मंगळुरूला रवाना झाले आहे.
‘माझा फ्लॅट’ योजनेला मंजुरी
गोव्यातील हजारो फ्लॅटधारकांसाठी राज्य सरकारने अत्यंत दिलासादायक पाऊल उचलले आहे. जमिनीचे मालक आणि बिल्डर यांच्यातील अंतर्गत वादामुळे ज्या नागरिकांना अद्याप आपल्या फ्लॅटचा मालकी हक्क मिळालेला नाही, त्यांच्यासाठी सरकारने ‘माझा फ्लॅट’ ही नवी योजना सुरू केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने या महत्त्वाकांक्षी योजनेला बुधवारी अधिकृत मंजुरी दिली.
पर्वरीतील हॉटेलमध्ये कंत्राटदाराचा आढळला मृतदेह
पर्वरी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये बंटी भरत प्रसाद (३९, रा. पश्चिम मुंबई) याचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. बंटी हा गोवा कला अकादमीच्या दुरुस्तीकामात उपकंत्राटदार म्हणून कार्यरत होता. कॅसिनोमध्ये पैसे उडवल्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता.
गुरुवार
व्यावसायिक संदीप सुवर्णा मृत्यू प्रकरणी संशयित रूपाश्रीवर गुन्हा दाखल
उडुपी (कर्नाटक) येथील वॉटर स्पोर्टस् बोट व्यावसायिक संदीप सुवर्णा (४२, रा. मालपे, उडुपी) यांच्या खून प्रकरणी अक्षता उर्फ रूपाश्री सी. या संशयित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला सध्या फरार असून, श्रीमंत व्यक्तींना कॅसिनोमध्ये जाळ्यात ओढून त्यांना हॉटेलमध्ये नेऊन लुटण्याचा तिचा कट असल्याचे तपासात पुढे आले आहे.
पोलिसांना न सापडणारा सोनार तक्रारदार महिलांनी दिला पकडून
सोन्याच्या दागिन्यांवर कमी व्याजदराने कर्ज देण्याच्या नावाखाली अनेक महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सडा येथील एका सराफाला फसवणूक झालेल्या महिलांनीच बुधवारी रात्री पकडून वास्को पोलिसांच्या स्वाधीन केले.
म्हापशातील व्यक्तीला सायबर गुन्हेगाराने २.७५ लाखांना लुटले
विठ्ठलवाडी, अन्साभाट येथील एका रहिवाशाला अज्ञात सायबर गुन्हेगाराने भीती दाखवून आणि मानसिक दडपण आणून त्याच्या बँक खात्यातून २ लाख ७५ हजार रुपये ऑनलाइन हस्तांतरित करून घेत लुबाडले आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवार
‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खून करणारी संशयित अखेर जाळ्यात
कॅसिनोत ओळख वाढवून श्रीमंतांना ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढून लुबाडणाऱ्या आणि उडुपी (कर्नाटक) येथील वॉटर स्पोर्टस् व्यावसायिक संदीप सुवर्णा (४२) यांच्या मृत्यूप्रकरणी फरार संशयित महिलेला कळंगुट पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अक्षता एम. के. ऊर्फ रूपाश्री सी. (३५, रा. बंगळुरू) असे या संशयित महिलेचे नाव असून, कर्नाटक पोलिसांच्या मदतीने तिला बंगळुरू येथून जेरबंद करण्यात आले आहे.
पीडित युवतीने जबाब फिरविल्यामुळे लैंगिक अत्याचारप्रकरणी युवक निर्दोष
डिचोली तालुक्यातील २० वर्षीय युवतीशी मैत्री करून २०२२ मध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी पीडित युवतीने न्यायालयात उलटतपासणीत जबाब फिरविल्यामुळे २२ वर्षीय संशयित युवकाची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
फ्रँचायझीच्या नावाखाली ४.८२ लाखांची फसवणूक
पर्वरी येथे फूड फ्रँचायझी सुरू करून देण्याच्या बहाण्याने थिवी येथील एका व्यावसायिकाची ४.८२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी डोंबिवलीतील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केतन दवे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
शनिवार
पर्वरीमधील ७ व्हिलांमध्ये चोरी
तोर्डा-पर्वरी येथील 'हायलँड्स व्हिला' या गेटेड संकुलात एकाच रात्रीत तब्बल सात व्हिला फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे पर्वरी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोवीस तास सुरक्षा कवच असलेल्या या हाय-प्रोफाइल सोसायटीत चोरट्यांनी ज्या पद्धतीने प्लॅनिंग केले त्याने स्थानिक कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच खाजगी सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महिलेची १.६७ लाखांची फसवणूक
विदेशातून सोने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू असलेले पार्सल पाठवल्याचे आमिष दाखवून आगशी येथील एका महिलेची तब्बल १ लाख ६७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आगशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
आयआरबीच्या गोवा विभागाच्या १२ हवालदारांना एएसआय पदी बढती
भारतीय राखीव दलाच्या गोवा विभागातील १२ हवालदारांना (सशस्त्र पोलीस) सहाय्यक उपनिरीक्षक पदी (एएसआय) बढती देण्यात आली आहे. या संदर्भातील जारी करण्यात आलेल्या आदेशात खालील हवालदारांना बढती देण्यात आली आहे.
लक्षवेधी
धावत्या रेल्वेची आपत्कालीन अलार्म चेन कोणत्याही कारणाविना ओढल्याप्रकरणी मडगाव न्यायालयाने संशयित पवन दीपक पाटील (२३, रा. जळगाव, महाराष्ट्र) याला दोषी मानले. न्यायालयाने त्याला दीड हजारांचा दंड व न्यायालय उठेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली.
मंगळुरू ते मडगाव रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा मोबाईल आणि पाकीट अज्ञात व्यक्तीने पळवला. याप्रकरणी प्रवाशाने कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या प्रकरणी मूळ राजस्थान येथील रहिवासी असलेले सर्वेश शर्मा यांनी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
फेसबुकवर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत फोंडा तालुक्यातील ३६ वर्षीय महिलेची २१.६४ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.