ऊस, सुपारी बागायतीचे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये भीती

जोयडा : उत्तर कन्नड जिल्ह्यातील (Uttara Kannada District) जोयडा तालुक्यात गोवा सीमेवरील (Goa-Karnataka border) अखेती ग्रामपंचायत परिसरात तीन जंगली हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्तींनी शेतकरी व्यंकटेश देसाई यांच्या ऊस शेतीचे, तर सुरेश देसाई यांच्या सुपारी बागायतीचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून हे तीन हत्ती खानापूर आणि जोयडा तालुक्याच्या सीमेवरील जंगल परिसरात ठाण मांडून आहेत. खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भात, ऊस, मका आणि इतर पिकांचे नुकसान केल्यानंतर आता हे हत्ती जोयडा तालुक्यातील गोवा सीमेलगतच्या अखेती परिसरात धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
सध्या भात लागवडीचा हंगाम सुरू असून शेतकरी दिवसरात्र शेतात काम करत आहेत. अशा वेळी हत्तींच्या भीतीमुळे शेतात जाण्यासही अनेकजण घाबरत आहेत. रात्रीच्या वेळी हत्ती शेतात घुसून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांचे संरक्षण करावे लागत आहे.
अखेतीसह गोवा सीमेलगतच्या परिसरात हत्तींच्या हालचाली सातत्याने सुरू असल्याने वन विभागाने या भागात गस्त वाढवून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, भात हंगामाच्या सुरूवातीलाच हत्ती पिकांची हानी करून सतावू लागल्याने; शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. मानव–हत्ती संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.