Home >> गोवा >> 'गोवा काँग्रेस' पक्षामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

'गोवा काँग्रेस' पक्षामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

नवीन पक्ष स्थापन करण्याच्या हालचालींवरून काँग्रेसमध्ये मोठी नाराजी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
6 hours ago
'गोवा काँग्रेस' पक्षामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

पणजी: गोव्याच्या राजकीय मंचावर सध्या एका नव्या घडामोडीने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. राज्यात थेट 'गोवा काँग्रेस' (Goa Congress) नावाचा एक नवा पक्ष स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या नव्या पक्षाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होऊन निवडणूक आयोगाने हरकती मागवणारी जाहीर नोटीस प्रसिद्ध केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि काँग्रेस विधीमंडळ गटनेते युरी आलेमाव यांनी अद्याप जाहीरपणे कोणतेही भाष्य न करता 'मौन' बाळगणे पसंत केले आहे.


May be an image of ‎chess, table, hospital and ‎text that says '‎GOA PRADESH CONGRESS CONGRESSCOMMITTEE COMMITTEE ២ ממששבא .すん‎'‎‎


१०० कोटींचा निधी आणि भाजपचा कथित डाव?

काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी गेल्या आठवड्यात एक खळबळजनक आरोप केला होता. "धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी नवीन पक्ष स्थापन करण्याचा भाजपचा डाव असून, यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे," असा दावा त्यांनी केला होता. या नोटीसनंतर "माझा अंदाज अखेर खरा ठरला," असे चोडणकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी चोडणकर यांच्या बौद्धिक तपासणीची गरज असल्याचे सांगत आरोप फेटाळले होते, तर प्रवक्ते सिद्धेश नाईक यांनीही याचे खंडन केले होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या नोटीसनंतर भाजपने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.


Girish Chodankar (@girishgoaINC) / Posts / X


पक्षातील नेतृत्वाला कंटाळूनच नवा पक्ष : फादर एरमितो रिबेलो

नव्या पक्षाच्या भूमिकेविषयी बोलताना फादर एरमितो रिबेलो यांनी काँग्रेसच्या अंतर्गत कारभारावर थेट निशाणा साधला. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेतृत्व ज्या प्रकारे चालवले जात आहे, त्याला कंटाळून कार्यकर्ते आणि नेते बेजार झाले आहेत. ज्या नेतृत्वाला पक्षात मान नाही, त्यांना सोबत घेऊन आगामी निवडणुकीला सामोरे जाणे शक्य नाही, असे आम्ही वरिष्ठांना सांगितले होते. पण पक्षश्रेष्ठींनी न ऐकल्यानेच या नाराजीतून हा पक्ष स्थापन होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यामागे भाजपचा हात असल्याचा संशय त्यांनी नाकारला आहे.


काँग्रेसने आपले घर मजबूत करावे: विजय सरदेसाई

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काँग्रेसला गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला दिला आहे. "लोकशाहीत पक्ष स्थापन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, हुबेहूब काँग्रेसच्याच नावाने हा पक्ष येत असल्याने काँग्रेसने यात लक्ष घालण्याची गरज आहे. गोवा फॉरवर्डची काँग्रेससोबत युती आहे, त्यामुळे काँग्रेसने आधी आपले घर मजबूत करावे," असे सरदेसाई म्हणाले.


काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली होणारी आगामी बैठक या विषयामुळे वादळी ठरण्याची शक्यता असून, काँग्रेस या अंतर्गत बंडाळीला कशी सामोरी जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा