Home >> गोवा >> गोवा सरकारने वीज सुविधाही विक्रीला काढल्या : सरदेसाई

गोवा सरकारने वीज सुविधाही विक्रीला काढल्या : सरदेसाई

कर्नाटक सरकारने फेटाळलेला वीज पुरवठा प्रस्ताव गोव्यातील डबल इंजिन सरकार का स्वीकारतेय? विचारला प्रश्न

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
10 hours ago
गोवा सरकारने वीज सुविधाही विक्रीला काढल्या : सरदेसाई

मडगाव: लोकांच्या करांमधून गोळा झालेल्या पैशांचा वापर करून सरकारने राज्यात कोट्यवधी रुपये खर्चून भूमिगत वीज वाहिन्या (Underground Cabling) जाळे उभारले. मात्र, आता याच तयार पायाभूत सुविधांचा थेट फायदा 'टाटा पॉवर' (Tata Power) सारख्या खासगी कंपनीला करून देण्यासाठी पंचायतींकडून 'ना हरकत दाखला' (NOC) मागितला जात आहे. हे डबल इंजिन सरकार वीज पुरवठ्यासारखी महत्त्वाची जनसुविधा खासगी कंपन्यांच्या घशात घालून गोवा विकायला निघाले आहे, असा खळबळजनक दावा गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. मडगाव येथील ओल्ड एज होमच्या पाहणी दरम्यान त्यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

या वेळी सरदेसाई यांनी केवळ वीजच नव्हे, तर वारसा स्थळे, बाजारपेठांमधील भ्रष्टाचार आणि राजकीय युतीवरही भाष्य केले.

ओल्ड एज होमवर २५ पट जास्त खर्च, पण सोयी गायब!

फातोर्डा मतदारसंघातील ओल्ड एज होमच्या नूतनीकरणाच्या खर्चावर बोट ठेवत ते म्हणाले, मी मंत्री असताना अवघ्या २५ लाख रुपयांत ४३ वृद्धांची राहण्याची आणि इतर सोयींची उत्तम व्यवस्था केली होती. आता सरकारने या प्रकल्पावर २५ पट जास्त पैसा उडवला, पण प्रत्यक्षात तिथे फक्त ८ वृद्ध राहत आहेत. या सरकारी उद्घाटनाला स्थानिक आमदार म्हणून मला साधे निमंत्रण देण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नाही. या सरकारच्या हातात गोव्याचा वारसा अजिबात सुरक्षित नाही.

'सोपो'च्या नावाखाली लूट आणि वाढता खर्च

एसजीपीडीए (SGPDA) मार्केटमधील अनागोंदीवर बोलताना त्यांनी थेट भाजप कार्यकर्त्यांवर निशाणा साधला. मार्केटमध्ये भाजपचे कार्यकर्ते 'सोपो'च्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून जादा पैसे वसूल करत आहेत. साडेतेरा कोटींचा हा मूळ प्रकल्प होता, पण आता त्यावर तीनपट जास्त खर्च करूनही तिथे ना आइस प्लांट आहे, ना कोल्ड स्टोअरेज! पारंपरिक मच्छीमारांना अद्याप स्वतंत्र जागा मिळालेली नाही. या वारेमाप खर्चाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असे सरदेसाई म्हणाले.

 काँग्रेसने अंतर्गत वाद लवकर मिटवावा!

गोव्यातील नव्या राजकीय पक्षाच्या चर्चेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, 'नव्या' पक्षाशी गोवा फॉरवर्डचा काहीही संबंध नाही. तो काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. काँग्रेससोबत आमची युती आहे. त्यांनी आपला अंतर्गत वाद तातडीने मिटवावा, अन्यथा जनता त्यांना गांभीर्याने घेणार नाही. माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ५ जुलै रोजी चर्चेसाठी संदेश पाठवला आहे, मात्र मी पुढील १५ दिवस गोव्याबाहेर असल्याने काँग्रेसला त्यांचा वाद मिटवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. आम्ही आमचे काम सुरू केले आहे, जनता हीच आमची हायकमांड असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दवंडे येथील प्रकल्पाला आणि माड कापणीला तीव्र विरोध

दवंडे येथील नव्या प्रकल्पाला आपला पूर्ण विरोध असल्याचे सांगत ते म्हणाले की, या संदर्भात पालिका आणि एसजीपीडीएला पत्र लिहून परवानगी न देण्याची मागणी केली जाईल. राज्याची भौगोलिक रचना बदलणारे प्रकल्प गोव्यात आणून लोकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका. कोणाला माड नको असतील किंवा अडचण असेल तर सांगा, आम्ही ते दुसरीकडे पुनर्रोपित (Shift) करू, पण माड कापून निसर्गाचा ऱ्हास खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा
सर्व पहा