
पणजी : माझ्यासाठी समाजसेवा निवडणूक प्रचार मोहीम नसून जगण्याची पद्धती आहे. माझ्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणजे राजकारणाचे साधन नसून समाजसेवेचे माध्यम असल्याचे प्रतिपादन प्रतिमा कुतिन्हो यांनी केले.
गुरुवारी पणजीत त्यांनी काँग्रेस पक्षात पुनः प्रवेश केला. यावेळी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन वाझ, कार्लुस फेरेरा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कुतिन्हो यांनी सांगितले की, माझा राजकारणातील प्रवास युवक काँग्रेस पासून सुरू झाला. महिला काँग्रेस अध्यक्ष म्हणून आम्ही अनेक आंदोलने केली. काही कारणास्तव मी पक्ष सोडला होता. मात्र, आजही मी काँग्रेसच्या धर्म निरपेक्ष विचारांची आहे. आजही माझ्या घरात आमचे नेते राहुल गांधी यांचे छायाचित्र आहे. राजकारण सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहे, हे मला काँग्रेस पक्षाने शिकवले आहे. जनसेवा करण्यासाठी मला पक्षाकडूनच प्रेरणा मिळाली आहे. योग्य वेळ आल्याने मी पक्षात परत येत आहे.
मागील चार वर्षे मी नावेलीसह राज्यात विविध ठिकाणी काम सुरू ठेवले आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे मी आभार मानते. मी पक्षात तिकीट किंवा अन्य कारणासाठी पुन्हा आलेले नाही. भाजप सरकारद्वारे झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम अद्याप सुरू आहे. सरकारच्या सर्व अवैध कामांविरोधात आवाज उठवण्याचे काम यापुढेही सुरू राहणार आहे. आम्ही सर्व एकत्र राहून भाजप सरकारला सत्तेबाहेर काढणार आहोत, असे कुतिन्हो यांनी सांगितले.
माणिकराव ठाकरे म्हणाले की, भाजप सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. सरकार जनतेसाठी काहीही करणार नाही. अशा भ्रष्ट सरकार विरोधात लढण्यासाठी आज आम्हाला प्रतिमा कुतिन्हो यांच्यासारखा आक्रमक नेता मिळाला आहे. पक्षात सर्वांनी एकत्र राहणे आवश्यक आहे. कुणीही वेगळे जाण्याचा विचार करू नये. प्रदेशाध्यक्षानी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे. भाजप विरोधात लढणाऱ्या अन्य पक्षांसोबत आम्ही राहणार आहोत.