Home >> गोवा >> विरोधकांकडून टीका, विकास मात्र भाजप सरकारकडूनच : लोबो

विरोधकांकडून टीका, विकास मात्र भाजप सरकारकडूनच : लोबो

मडगावातील नूतनीकरण केलेल्या ओल्ड एज होमचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
45 mins ago
विरोधकांकडून टीका,  विकास मात्र भाजप सरकारकडूनच : लोबो

मडगाव: प्रोव्हेदोरियाच्या मडगाव येथील ओल्ड एज होमच्या नूतनीकरणासाठी ६.४० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, येथील खाटांची संख्या आता ८५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील सर्वच वृद्धाश्रमांचे नूतनीकरण करण्याची सरकारची तयारी आहे. विरोधकांचे काम केवळ टीका करण्याचे आहे, मात्र प्रत्यक्षात भाजप सरकारच राज्याचा खरा विकास करत आहे, असे प्रतिपादन जीएसआयडीसीचे (GSIDC) अध्यक्ष तथा आमदार मायकल लोबो यांनी केले.

मडगाव येथील प्रोव्हेदोरियाच्या नूतनीकरण केलेल्या ओल्ड एज होमच्या इमारतीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, जलस्रोत व प्रोव्हेदोरिया मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार मायकल लोबो, प्रोव्हेदोरियाचे सचिव प्रसन्न आचार्य, संचालक विनायक वळवईकर आणि जीएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रोहित कदम प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचे चरणस्पर्श करून व त्यांचे आशीर्वाद घेऊन करण्यात आली.

यावेळी आमदार लोबो म्हणाले की, राज्य सरकार समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. प्रत्येकाने आपल्या वृद्ध माता-पित्यांची घरातच काळजी घेतली पाहिजे; मात्र ज्यांच्या घरात ज्येष्ठांची काळजी घेणारे कुणीही नाही, त्यांच्या हक्काच्या हक्कासाठी सरकारने ही दर्जेदार सोय उपलब्ध केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः फोन करून सर्व ज्येष्ठांची विचारपूस केली असून, ते लवकरच येथे भेट देणार असल्याचेही लोबो यांनी सांगितले.

मंत्री दिगंबर कामत यांनी बदलत्या कौटुंबिक व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आजकाल मुले परदेशात किंवा कामात व्यस्त असल्याने त्यांना आई-वडिलांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. पूर्वीच्या संयुक्त कुटुंब पद्धतीत असे घडत नव्हते. पैशांपेक्षा पालकांना प्रेमाची गरज असते, हे ओळखून सरकारने त्यांच्या उत्तम वास्तव्याची आणि देखभालीची सोय केली आहे. पुढे बोलताना त्यांनी आयआयटी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. आयआयटी प्रकल्पामुळे गोव्यातील स्थानिक मुलांना मोठा फायदा होईल आणि राज्याला शैक्षणिक क्षेत्रात नवी ओळख मिळेल. त्यामुळे विरोधकांनी केवळ विरोधाला विरोध न करता, अशा महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री सुभाष शिरोडकर यांनी कर्मचाऱ्यांना संवेदनशीलतेने काम करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, रुग्णालयातील आणि प्रोव्हेदोरियातील कामात मोठा फरक आहे. येथे राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींच्या भावनांचा आदर करत त्यांना कुटुंबासारखी माया देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत दक्षिण गोव्यात चार आणि उत्तर गोव्यात सहा वृद्धाश्रमे कार्यरत असून, लवकरच आणखी दोन ओल्ड एज होमच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

रावणफोंड पूल ऑक्टोबरपर्यंत पूर्णत्वास : लोबो

रावणफोंड येथील चारपदरी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील तीन महिन्यांत ते पूर्ण होईल. ऑक्टोबर महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. याशिवाय, मडगावच्या घाऊक (होलसेल) मासळी मार्केटच्या इमारतीचे कामही पूर्ण झाले असून, लवकरच त्याचे उद्घाटन करून ती 'एसजीपीडीए'कडे (SGPDA) सुपूर्द केली जाईल. मडगावातील इतरही काही महत्त्वाचे प्रकल्प ३० नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करून त्यांचे उद्घाटन केले जाईल, अशी माहिती मायकल लोबो यांनी दिली.

हेही वाचा
सर्व पहा