Home >> गोवा >> कळंगुट रिसॉर्टमध्ये कर्नाटकातील मंत्र्यांच्या माजी चालकाचा संशयास्पद मृत्यू

कळंगुट रिसॉर्टमध्ये कर्नाटकातील मंत्र्यांच्या माजी चालकाचा संशयास्पद मृत्यू

गळ्यातील सोनसाखळी गायब, सोबत असलेल्या महिलेचा शोध सुरू

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
कळंगुट रिसॉर्टमध्ये कर्नाटकातील मंत्र्यांच्या माजी चालकाचा संशयास्पद मृत्यू

म्हापसा : कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये कर्नाटकातील एका मंत्र्यांचे माजी वाहनचालक तसेच मालपे-उडुपी येथील वॉटर स्पोर्ट्स बोट व्यावसायिक संदीप सलायम मालपे यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी गायब असल्याचेही उघड झाले आहे. सोबत रिसॉर्टमध्ये आलेल्या महिलेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

मंगळवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रिसॉर्टच्या खोलीत संदीप मालपे मृतावस्थेत आढळून आल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने कळंगुट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील रुग्णालयात पाठवला. बुधवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत्यूचे कारण स्पष्ट केले नसल्याने प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप मालपे हे आपल्या भावंडे आणि मित्रांसह कर्नाटकातील उडुपी येथून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. २९ जून रोजी ते कॅसिनोमध्ये गेले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी ते सर्वजण कळंगुटमध्ये आले. संदीप यांच्यासोबत एक महिला असल्याने ते संबंधित रिसॉर्टमध्ये उतरले, तर त्यांचे भाऊ आणि मित्र अन्य हॉटेलमध्ये वास्तव्यास गेले.

संदीप मालपे यांनी मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रिसॉर्टमध्ये चेक-इन केले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा फोन लागत नसल्याने नातेवाईक आणि मित्र रिसॉर्टमध्ये पोहोचले. त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाकडे खोलीत भेटण्याची विनंती केली.  मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. याचदरम्यान, सायंकाळी चारच्या सुमारास संदीप यांच्यासोबत असलेली महिला रिसॉर्टमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.

रात्री उशीरापर्यंत संपर्क होत नसल्याने नातेवाईक पुन्हा रिसॉर्टमध्ये आले. त्यांच्या विनंतीनंतर खोलीचा दरवाजा उघडण्यात आला असता संदीप मालपे हे खोलीत निपचित अवस्थेत पडलेले आढळून आले.

पंचनाम्या वेळी पोलिसांना खोलीत सिगारेटची पाकिटे आणि मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. प्राथमिक चौकशीत संदीप यांनी कॅसिनो तसेच रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, शवचिकित्सा अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश सिनारी करीत आहेत.


हेही वाचा
सर्व पहा