Home >> देश -परदेश >> "मला मुद्दाम नापास केले..." जुना राग मनात ठेवून माजी विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकू हल्ला!

"मला मुद्दाम नापास केले..." जुना राग मनात ठेवून माजी विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकू हल्ला!

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
42 mins ago
"मला मुद्दाम नापास केले..." जुना राग मनात ठेवून माजी विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकू हल्ला!

छत्रपती संभाजीनगर : शाळेत नववीच्या परीक्षेत नापास केल्याचा राग मनात धरून एका १७ वर्षीय माजी विद्यार्थ्याने आपल्या वर्गशिक्षकावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, संशयित विद्यार्थ्याने २०२३ मध्ये या शाळेतून नववीची परीक्षा दिली होती, ज्यामध्ये तो नापास झाला होता. त्यानंतर त्याने शाळा सोडली होती. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास तो पुन्हा शाळेत आला आणि त्याने फेरप्रवेशाची मागणी केली. मुख्याध्यापकांनी त्याला रीतसर अर्ज देण्यास सांगितले; मात्र त्याने अर्ज भरण्यास नकार दिला आणि आपल्या जुन्या वर्गशिक्षकांना मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलावून घेण्याचा हट्ट धरला.

वर्गशिक्षक केबिनमध्ये येताच विद्यार्थ्याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. "सरांनी मला मुद्दामहून विज्ञान आणि गणित विषयात नापास केले, ज्यामुळे माझे वर्ष वाया गेले," असा आरोप त्याने केला. मुख्याध्यापक आणि शिक्षक त्याला समजावत असतानाच, संशयिताने अचानक शर्टच्या आत लपवून ठेवलेला चाकू काढला आणि शिक्षकाच्या पोटावर वार केले. हा चाकू त्याने ऑनलाईन साईटवरून मागवला होता आणि मंगळवारी सकाळीच तो त्याला मिळाला होता.

मुख्याध्यापकांनी आरडाओरड केल्यावर शाळेतील इतर कर्मचारी केबिनकडे धावले; मात्र संशयिताने त्यांनाही चाकूचा धाक दाखवून बाहेर हाकलले. काही वेळ जखमी शिक्षकाला केबिनमध्ये कोंडून ठेवल्यानंतर तो तिथून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून संशयित आरोपीला गवळीपुरा भागातून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेला संशयित सध्या १७ वर्षांचा आहे. नववीत नापास झाल्यानंतर तो एका खाजगी रुग्णालयात हेल्पर म्हणून काम करत होता. त्याच्या कुटुंबात आई खानावळ चालवते, मोठी बहीण शिक्षिका आहे, तर लहान भाऊ अद्याप शिकत आहे. या घटनेचा पुढील तपास छावणी पोलीस करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा