रक्तस्रावामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेचा मृत्यू

तमिळनाडू : सोशल मीडियावरील अपुऱ्या आणि अनधिकृत माहितीवर आंधळा विश्वास ठेवणे एका कुटुंबाला महागात पडले आहे. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरच्या घरी 'नैसर्गिक प्रसूती' करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, तब्बल चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर एका ३२ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला आपला जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना तमिळनाडूतील तिरुप्पूर जिल्ह्यातील पुंजाई थलवैपलायम गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शशीकला आणि तिचे पती कोलंदैसामी (उर्फ कार्तिक) हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांना आधीच एक ६ वर्षांची मुलगी असून, तिची प्रसूती सिझेरियनद्वारे (C-Section) झाली होती. दुसऱ्या गरोदरपणात शशीकला यांनी एकदाही रुग्णालयात जाऊन कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नव्हती, तसेच आवश्यक लसीकरणही घेतले नव्हते. सरकारी नियमांनुसार असणाऱ्या 'प्रसूती आणि बालक देखरेख यंत्रणेत' देखील या गरोदरपणाची नोंद करण्यात आली नव्हती.
२४ जून रोजी पहाटे शशीकला यांना प्रसूती कळा येऊ लागल्या. मात्र, सिझेरियनचा पूर्वेतिहास असतानाही वैद्यकीय उपचारांऐवजी पती आणि सासूने यूट्यूबवरील व्हिडिओच्या आधारे घरीच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. घरात बाळ जन्माला आले, परंतु प्रसूतीनंतर वार पूर्णपणे बाहेर न पडल्यामुळे शशीकला यांना प्रचंड रक्तस्राव सुरू झाला.
परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तस्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कोईम्बतूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान २८ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने नवजात बाळ सुरक्षित असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
याप्रकरणी मेडिकल ऑफिसरांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शशीकला यांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.