१६०० पेक्षा अधिक चुकांमुळे मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

भुवनेश्वर : ओडिशातील शालेय शिक्षण विभागाचा एक अजब कारभार समोर आला आहे. इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात एका शैक्षणिक धड्याऐवजी चक्क ऐश्वर्या राय यांच्या एका चित्रपटातील 'निंबुडा निंबुडा' या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्याचे संपूर्ण बोल छापण्यात आले आहेत.
पाचवीच्या 'पल्लवी' या इंग्रजी पुस्तकात 'निंबुडा' गाण्याचा हिंदीतून इंग्रजीत केलेला ध्वन्यात्मक अनुवाद (Phonetic Translation) छापण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे गाणे राजस्थानी लोकगीताचे उदाहरण म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, आठवीच्या पुस्तकात 'मिशन काश्मीर' चित्रपटातील 'रिंद पोश माल' हे काश्मिरी लोकगीत आणि तिसरीच्या पुस्तकात 'बुंबरो बुंबरो' हे गाणे छापले गेले आहे. चित्रपट संगीताचा अशा प्रकारे अभ्यासक्रमात समावेश केल्याने शिक्षणतज्ज्ञांनी आणि पालकांनी तीव्र आश्चर्य व संताप व्यक्त केला आहे.
पुस्तके छापण्यापूर्वी मजकूर निवड, शैक्षणिक समितीचे प्रमाणीकरण आणि अंतिम मुद्रितशोधन अशा तीन स्तरांवर तपासणी होते. तरीही एवढी मोठी चूक संपादकांच्या नजरेतून कशी सुटली? असा संतप्त सवाल पालक संघटना आणि नागरी समाजाने उपस्थित करत सरकारवर कडाडून टीका केली आहे.
प्राथमिक तपासणीत इयत्ता पहिली ते आठवीच्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये तब्बल १,६०० हून अधिक चुका आढळून आल्या आहेत. सरकारने हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला असून दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
जिल्हा शिक्षणाधिकारी चक्रधर मल्लिक यांनी माहिती दिली की, तूर्तास शाळांना 'दुरुस्ती पत्रके' (Correction Sheets) पाठवण्यात आली असून, शिक्षक त्या सुधारणांनुसार विद्यार्थ्यांना शिकवतील. मात्र, अनेक ठिकाणी पालकांनी आंदोलने करत ही चुकीची पुस्तके पूर्णपणे मागे घ्यावीत आणि नवीन सुधारित आवृत्ती वितरित करावी, अशी मागणी लावून धरली आहे.