Home >> देश -परदेश >> "पैसा कुठे जातो काही कळतही नाही..." महिन्याला सव्वादोन लाख पगार, बचत मात्र शून्य!

"पैसा कुठे जातो काही कळतही नाही..." महिन्याला सव्वादोन लाख पगार, बचत मात्र शून्य!

महिन्याला सव्वादोन लाख रुपये येऊनही शेवटी खिशात आणि मनात उरतो फक्त मोठा प्रश्न असे सांगत आपली विवंचना मांडणाऱ्या बंगळुरू येथील एका आयटी प्रोफेशनलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जाणून घ्या महानगरातील वाढता खर्च आणि कॉर्पोरेट जीवनशैलीचे वास्तव.

Story: गोवन वार्ता |वेब डेस्क |
2 hours ago
"पैसा कुठे जातो काही कळतही नाही..." महिन्याला सव्वादोन लाख पगार, बचत मात्र शून्य!

बंगळुरू : आजच्या कॉर्पोरेट जगतात लाखो रुपयांचे पॅकेज मिळवणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. विशेषतः आयटी हब समजल्या जाणाऱ्या बंगळुरू सारख्या शहरात आयटी प्रोफेशन्सचा पगार आणि त्यांची जीवनशैली नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. मात्र, नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एका सॉफ्टवेअर कन्सल्टंटचा जुना इंटरव्यू या चकचकीत दुनियेमागील एक वेगळेच वास्तव समोर आणत आहे. वार्षिक ४५ लाख रुपयांचे तगडे पॅकेज असूनही महिनाअखेरीस हातामध्ये शून्य बचत उरते, ही धक्कादायक कबुली एका आयटी प्रोफेशनलने दिली आहे. या विधानाने सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक नवी आणि मोठी आर्थिक चर्चा छेडली असून कॉर्पोरेट जीवनशैलीच्या मर्यादांवर बोट ठेवले आहे.


बगळुरूमध्ये कार्यरत असलेल्या सूर्य नावाच्या या सॉफ्टवेअर कन्सल्टंटने एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आर्थिक गणिताचा पाढा वाचला. सूर्य यांच्या सांगण्यानुसार, सर्व कर कपात (Tax Deduction) झाल्यानंतर त्यांच्या हातात दरमहा सुमारे २ लाख ४५ हजार रुपये एवढी मोठी रक्कम येते. असे असूनही, महिन्याच्या शेवटी गुंतवणूक करण्यासाठी किंवा भविष्यासाठी बचत करण्यासाठी त्यांच्याकडे फारसे पैसे शिल्लक राहत नाहीत. लग्न आणि मुलाच्या जन्मानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या कमालीच्या वाढल्या असून, वाढत्या महागाईत नियमित गुंतवणुकीचा आलेख उंचावणे अत्यंत आव्हानात्मक बनले आहे.


150+ Night Traffic In Bangalore Stock Photos, Pictures & Royalty-Free  Images - iStock


आपल्या मासिक खर्चाचा सविस्तर हिशेब मांडताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या पगारातील सर्वात मोठा हिस्सा म्हणजेच तब्बल ६३ हजार रुपये हे गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये जातात. याशिवाय, मुलाच्या शालेय शिक्षणाचा खर्च दरमहा ११ ते १२ हजार रुपयांच्या घरात आहे. घरगुती राशन  आणि खाण्यापिण्याचा खर्च १२ हजार रुपये येतो, तर इतर किरकोळ आणि रोजचे घरगुती खर्च मिळून २० हजार रुपयांपर्यंत पोहोचतात. मुलाच्या प्रवेशाच्या वेळी एकूण २ लाख ८५ हजार रुपये भरावे लागले होते, ज्यामध्ये नॉन-रिफंडेबल फी, सिक्युरिटी डिपॉझिट आणि पहिल्या वर्षाच्या शुल्काचा समावेश होता. सोशल मीडियावर काहींनी घरगुती कामासाठी नोकर (House Helper) ठेवण्यावरून टीका केली, त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, महानगरात पती-पत्नी दोघेही नोकरी करत असल्याने घरकामासाठी महिन्याला ३ हजार ३०० रुपये देऊन मदतनीस ठेवणे ही चैन नसून गरज आहे.


Estimate Calculator vs. Manual Calculation: Which Is Better for Home  Construction?


हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर नेटकऱ्यांचे मत प्रामुख्याने दोन भागांत विभागले गेले आहे. काही युजर्सच्या मते, इतकी उत्तम कमाई असूनही जर बचत होत नसेल, तर ते केवळ कमकुवत आर्थिक नियोजन आणि अवाजवी जीवनशैलीचे लक्षण आहे. अनेकदा कॉर्पोरेट जगतात राहताना इतरांना दाखवण्यासाठी किंवा स्टेटस राखण्यासाठी महागड्या गाड्या, ब्रँडेड वस्तू आणि हॉटेलिंगवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. दुसरीकडे, बेंगळुरू, मुंबई किंवा पुणे सारख्या शहरांमध्ये वाढलेली घरभाडी, घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि आंतरराष्ट्रीय शाळांची अवाजवी फी पाहता, प्रामाणिकपणे जगणाऱ्या मध्यमवर्गाची कशी ओढाताण होते, हे या उदाहरणावरून स्पष्ट होते.


Corporate Party Venues in Bangalore | Team Outing & Office Party Spots

आजच्या घडीला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांमध्ये पगाराचा आकडा जेवढ्या वेगाने वाढतो आहे, तेवढ्याच वेगाने नोकरीची असुरक्षितता (Loss of Security) आणि कामाचा ताणही वाढतो आहे. अनेकदा जॉब सॅटिस्फॅक्शन (Job Satisfaction) नसल्यामुळे किंवा भविष्यातील अनिश्चिततेमुळे तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी तरुण पिढी 'रिटेल थेरपी' किंवा महागड्या ट्रिप्सवर खर्च करते, ज्यामुळे आर्थिक गणित बिघडते. हा संपूर्ण प्रकार आपल्याला याची जाणीव करून देतो की, केवळ मोठा पगार असणे म्हणजे आर्थिक स्थैर्य नव्हे. जोपर्यंत खर्चाची प्राथमिकता ठरवली जात नाही आणि उत्पन्नातील एक ठराविक हिस्सा शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवला जात नाही, तोपर्यंत कितीही मोठी कमाई असली तरी आर्थिक चणचण भासतच राहणार.


हेही वाचा
सर्व पहा