
लाहोर : पाकिस्तानमधील लाहोर शहराच्या काहना परिसरात मंगळवारी एका खासगी शिकवणी वर्गाच्या इमारतीचे छत अचानक कोसळून १४ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. (As many as 14 children lost their lives. while several others were injured, when the roof of a private tuition centre collapsed in Lahore’s Kahna area, officials said.). मृतांमध्ये पाच ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. ढिगाऱ्याखालून अनेक विद्यार्थ्यांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका महिला शिक्षिकेचाही समावेश आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी शिकवणी वर्गात सुमारे २० जण उपस्थित होते. छत कोसळल्यानंतर विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले होते. बचाव पथकांनी अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर शोध आणि बचाव मोहीम पूर्ण केली.
प्राथमिक तपासात संबंधित इमारतीचा काही भाग बांधकामाधीन असल्याचे समोर आले आहे. घटनेप्रकरणी घरमालकासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. इमारतीच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शहबाज शरीफ यांच्याकडून दु:ख व्यक्त
दरम्यान, शहबाज शरीफ यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मरियम नवाझ यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देत जबाबदारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. "निष्काळजीपणामुळे निष्पाप मुलांचे जीव गेले असून दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही," असे त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये निकृष्ट बांधकाम साहित्य आणि अपुऱ्या सुरक्षा उपायांमुळे इमारती व छत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने या दुर्घटनेने पुन्हा एकदा बांधकाम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.