स्पेन, जर्मनी, इटली, डेन्मार्कसह १६ देशांमध्ये तापमानाचे विक्रम मोडीत; डेन्मार्कमध्ये रस्ते वितळले, हजारो शाळा बंद

पॅरीस : युरोप सध्या विक्रमी उष्णतेच्या (Heatwave in across Europe) लाटेचा सामना करत आहे. अनेक देशांमध्ये तापमानाने गेल्या कित्येक दशकांतील विक्रम मोडले आहेत. तीव्र उष्णतेमुळे फ्रान्समध्ये तब्बल एक हजार अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील सुमारे ८५ टक्के मृत्यू वृद्ध व्यक्तींचे असल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.
फ्रान्सच्या आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार, २४ ते २७ जून या कालावधीत सरासरीपेक्षा सुमारे एक हजार अधिक मृत्यू झाले. राजधानी पॅरिस आणि आसपासच्या भागात सर्वाधिक परिणाम दिसून आला असून, अनेक मृत्यू घरीच झाल्याचे समोर आले आहे.
१६ युरोपीय देशांमध्ये विक्रम मोडीत
दरम्यान, जर्मनी, स्पेन, ब्रिटन, डेन्मार्क, इटली आणि स्वित्झर्लंडसह १६ युरोपीय देशांमध्ये तापमानाने अनेक दशकांपूर्वीचे विक्रम मोडले आहेत. वृत्तसंस्थेच्या अंदाजानुसार, युरोपमधील तब्बल १९१ दशलक्ष नागरिकांनी ३५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमानाचा सामना केला.
ब्रिटनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'
ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच सलग तीन दिवस उष्णतेसाठी 'रेड वॉर्निंग' जारी करण्यात आली आहे. दक्षिण इंग्लंडमध्ये तापमान ३६.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. जून महिन्यातील हा नवा विक्रम ठरला आहे. यापूर्वीचा ३५.६ अंशांचा विक्रम तीन वेळा मोडीत निघाला.
१ हजार शाळा बंद, रुग्णालयांत आणीबाणी
उष्णतेमुळे विजेच्या मागणीत ४५ वर्षांतील उच्चांक नोंदवला गेला असून, उष्माघात आणि श्वसनविकारांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली की अनेक रुग्णालयांना आणीबाणी जाहीर करावी लागली. तसेच एक हजाराहून अधिक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळांच्या प्रसरणामुळे रेल्वेगाड्यांवर वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. अनेक भागांत पाण्याची बचत करण्यासाठी होसपाईप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
स्पेनमध्ये ४५.१ अंशांची नोंद; चार दिवसांत २०० हून अधिक मृत्यू
स्पेनमध्ये सध्या युरोपमधील सर्वाधिक उष्णता अनुभवली जात आहे. अंदुजार शहरात ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर बिलबाओ शहरात ४२.७ अंश सेल्सिअसचा जून महिन्यातील नवा विक्रम प्रस्थापित झाला.
गेल्या चार दिवसांत उष्णतेमुळे २०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. दुष्काळ आणि उष्णतेमुळे देशभरात भीषण वणवे पेटले आहेत. अनेक भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
जर्मनीत इतिहासातील सर्वाधिक तापमान
जर्मनीतील ड्राउविट्झ शहरात ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. देशाच्या इतिहासातील हे सर्वाधिक तापमान ठरले आहे. कुबशुट्झ येथे रात्रीचे तापमान २९.४ अंश सेल्सिअसच्या खाली न गेल्याने, सुमारे १५० वर्षांतील ही सर्वात उष्ण रात्र ठरली.
उष्णतेच्या तीव्रतेमुळे अनेक महामार्ग वितळले असून, त्यांना तडे गेल्याने काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच अनेक क्रीडा स्पर्धा, संगीत महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलण्यात आले आहेत.
थंड हवामानासाठी प्रसिद्ध डेन्मार्कही तापला
थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या डेन्मार्कमध्ये यंदा तापमानाने सर्व विक्रम मोडले. शनिवारी येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. १८७४ पासूनच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.
तीव्र उष्णतेमुळे देशातील अनेक रस्ते वितळण्यास सुरुवात झाली आहे. त्यावरील झीज टाळण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांकडे धाव घेतली.
फ्रान्समध्ये १,३५० शाळा बंद, वीजपुरवठा खंडित
फ्रान्समधील पिसोस येथे ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राष्ट्रीय सरासरी तापमान ३० अंशांच्या पुढे गेले आहे. देशातील अनेक भागांत रात्रीचे तापमानही २२ अंशांच्या खाली आले नाही. रेल्वे रुळांवरील उष्णतेमुळे अनेक रेल्वे सेवा प्रभावित झाल्या. वीजपुरवठा खंडित झाल्याने सुमारे ५० हजार घरांमध्ये अंधार पसरला आहे. सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदी घातली आहे. उष्णतेच्या तडाख्यामुळे १,३५० हून अधिक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
शास्त्रज्ञांच्या मते, हवामान बदलामुळे युरोपमधील तापमान जागतिक सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात अशा उष्णतेच्या लाटा अधिक वारंवार आणि अधिक तीव्र स्वरूपात अनुभवायला मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.