पाच जणांवर वन खात्याची कारवाई; सोबत असलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

पणजी: म्हादई वन्यजीव अभयारण्यातील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या 'बाराजणांच्या धबधब्यावर' विनापरवाना प्रवेश केल्याप्रकरणी गोवा वन खात्याने पाच जणांविरुद्ध कारवाई केली आहे. या सहा जणांच्या गटातील ओडिशा येथील आदित्य दीपक कुमार सत्पती या २० वर्षीय पर्यटकाचा धबधब्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर वन खात्याने ही कारवाई केली.
रविवारी बेळगाव येथून सहा युवकांचा एक गट ‘बाराजणांच्या धबधब्यावर’ फिरायला आला होता. त्यातील आदित्य दीपक कुमार सत्पती हा युवक बुडाला होता. काल सोमवारी त्याचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर वन खात्याने सोबत असलेल्या पाचजणांविरुद्ध कारवाई करणे सुरू केले आहे.
मुसळधार पाऊस, वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन 'बाराजणांच्या धबधबा' परिसरात पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, संबंधित गटाने आवश्यक परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सूचनांचे काटेकोर पालन करावे : वन खाते
दरम्यान, पर्यटकांनी पावसाळ्यात धोकादायक आणि प्रतिबंधित पर्यटनस्थळांना भेट देणे टाळावे तसेच वन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वन खात्याने केले आहे.