हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना दिलासा

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणाव आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या दरांनंतर केंद्र सरकारने १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १८३.५० रुपयांची मोठी कपात केली आहे. (Price of 19-kg commercial LPG cylinder reduced). या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच इतर व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दर कपातीनंतर दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ३,११३ रुपयांवरून २,९३० रुपयांवर आली आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यामुळे सरकारने पुरवठ्यावर निर्बंध घालण्यासह अनेक वेळा दरवाढही केली होती.
दरम्यान, देशांतर्गत उत्पादनात सुधारणा झाल्याने तसेच आयातीतून एलपीजीच्या खेपा अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्याने सरकारने व्यावसायिक एलपीजीवरील सर्व क्षेत्रनिहाय निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक ग्राहकांना आता संघर्षपूर्व काळातील पातळीप्रमाणे एलपीजीचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संघर्षकाळात थांबविण्यात आलेला बल्क एलपीजी पुरवठाही आता टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येत असून सध्या तो पूर्वीच्या वापराच्या सुमारे ५० टक्के पातळीवर पुन्हा सुरू झाला आहे.
पश्चिम आशियातील संकटाच्या काळात देशातील एलपीजी साठे सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत विशेष अधिकारांचा वापर करून सी-३ आणि सी-४ हायड्रोकार्बन प्रवाहांचा वापर केवळ एलपीजी उत्पादनासाठी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे पेट्रोकेमिकल आणि इतर औद्योगिक क्षेत्रांना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा कमी करण्यात आला होता.
आता परिस्थिती सुधारत असल्याने सरकारने या प्रवाहांचा एलपीजी उत्पादनासाठी होणारा अतिरिक्त वापर कमी करून पेट्रोकेमिकल आणि इतर संबंधित उद्योगांना पूर्वी प्रमाणे वाटप पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी देशांतर्गत एलपीजी उत्पादन दररोज ४० हजार टनांपेक्षा जास्त ठेवण्यावरही भर दिला जाणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.