Home >> देश -परदेश >> मुस्लिम महिलेने केले आरएसएस कार्यकर्त्यावर अंत्यसंस्कार

मुस्लिम महिलेने केले आरएसएस कार्यकर्त्यावर अंत्यसंस्कार

केरळमध्ये माणुसकीचे दर्शन : कुटुंबाने वाऱ्यावर सोडलेल्या वृद्धाला आधार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
50 mins ago
मुस्लिम महिलेने केले आरएसएस कार्यकर्त्यावर अंत्यसंस्कार

कासारगोड : ‘केरला स्टोरी’ (Kerala Story) या चित्रपट शृंखलेच्या माध्यमातून केरळचे वेगळे चित्रीकरण बघायला मिळाले. मात्र प्रत्यक्षात तेथील माणुसकी आणि सामाजिक एकतेचे एक उदाहरण समोर आले आहे. कासारगोड (Kasargod) जिल्ह्यातील कुटुंबाने वाऱ्यावर सोडलेल्या एका माजी आरएसएस कार्यकर्त्याच्या (RSS worker) अंत्यसंस्काराची प्रक्रिया (final rights) एका मुस्लिम महिलेने (Muslim women) पार पाडली. या तिच्या अनुकरणीय कार्याची देशभर चर्चा होत आहे.

मंजेश्वर विभागाच्या जिल्हा पंचायत सदस्य आणि विकास स्थायी समितीच्या अध्यक्ष असलेल्या इरफाना इक्बाल (Irfana Iqbal) यांनी नारायणन थोट्टथोडी (६४) (Narayanan Thottathodi) यांच्या अंत्यसंस्काराचे नेतृत्व केले. नारायणन यांचे २५ जून रोजी निधन झाले. सुमारे महिनाभर उपचार घेतल्यानंतर कोझिकोड येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले होते. ‘मंजेश्वरममधील चिगुरपाडावी येथील रहिवासी असलेले नारायणन हे एक गरीब व्यक्ती आणि भाजपचे दीर्घकाळापासूनचे कार्यकर्ते होते,’ असे इरफाना इक्बाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले.

इरफाना पुढे म्हणाल्या, ‘यापूर्वी मी त्यांच्याबद्दलचा एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामध्ये ते एका दुकानाच्या ओट्यावर एकाकी अवस्थेत पडलेले दिसत होते. तोंडाच्या कर्करोगामुळे त्यांना अन्न किंवा पाणीही घेता येत नव्हते.’

इरफाना यांचे कुटुंब मंजेश्वर येथे ‘शेख झायेद फाउंडेशन’ अंतर्गत वृद्धाश्रम चालवते. त्यांना नारायणन यांच्या दयनीय अवस्थेबद्दल एका स्थानिक पंचायत सदस्याकडून माहिती मिळाली. ‘त्यांना कोणीही उत्तराधिकारी नसल्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी आम्हाला बोलावण्यात आले होते. मात्र तोंडाच्या कर्करोगामुळे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे आमच्या लक्षात आले,’ असे इरफाना यांनी सांगितले. त्यानंतर इरफाना यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. सेवाभावी संस्थेच्या स्वयंसेवकांनी त्यांना प्राथमिक उपचार दिले आणि रुग्णालयात नेले.

‘सुरुवातीला आम्ही त्यांना वृद्धाश्रमात हलवण्याचे नियोजन केले होते, परंतु त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे आम्ही त्यांना रुग्णालयात नेले, जिथे त्यांना चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यामुळे आम्ही कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्येच उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला,’ असे इरफाना यांनी सांगितले.

२५ जून रोजी नारायणन यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन पत्नी आणि मुले होती. परंतु कोणालाही त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची इच्छा नव्हती. मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्याची संमती त्यांच्या कुटुंबीयांनी इरफाना यांना दिली.

‘त्यांच्या निधनाची बातमी समजल्यापासून मी त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते, पण त्यापैकी कोणीही मृतदेह स्वीकारण्यास तयार नव्हते. मी या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. कोणीही जबाबदारी घेण्यास पुढे येत नसल्यामुळे, मी कोझिकोड मेडिकल कॉलेजमधून मृतदेह उप्पला येथे आणला,’ असे इरफाना यांनी पुढे सांगितले.

त्यानंतर त्यांनी मृतदेह उप्पला येथील सार्वजनिक स्मशानभूमीत नेला आणि २६ जून रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार केले. बुरखा परिधान केलेल्या एका महिलेने हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केल्याचे दृश्य सोशल मीडियावर लवकरच व्हायरल झाले. ‘मी एका मुलीच्या नात्याने नारायणन यांचे अंत्यसंस्कार केले. माणुसकी ही धर्म आणि राजकारणापेक्षा श्रेष्ठ आहे,’ असे इरफाना यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा