Home >> गुन्हे >> सीसीटीव्ही पाहून दुकानदारानेच पटवली चोरांची ओळख

सीसीटीव्ही पाहून दुकानदारानेच पटवली चोरांची ओळख

म्हापसा येथील सराफी दुकानातील चोरी प्रकरण : आंतरराज्य टोळीतील एकाला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th June, 11:58 pm
सीसीटीव्ही पाहून दुकानदारानेच पटवली चोरांची ओळख

म्हापसा : येथील बाजारपेठेतील मोतीलाल लोटलीकर यांच्या सराफी दुकानातून दोन महिन्यांपूर्वी चोरी झालेल्या तीन सोनसाखळ्यांच्या प्रकरणात म्हापसा पोलिसांनी रायगड (महाराष्ट्र) येथील आंतरराज्य टोळीतील मनीष मनोहर मोरे (४४, रा. चांदीवली, अंधेरी) याला अटक केली आहे. कांदोळीतील एका सराफी दुकानातील चोरीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तक्रारदाराने संशयितांची ओळख पटविल्यानंतर ही कारवाई करणे शक्य झाले.
२३ एप्रिल रोजी सायं. ४.१३ ते ५च्या दरम्यान ही घटना घडली होती. दोन महिला आणि काही पुरुष ग्राहक असल्याचा बनाव करून दुकानात आले होते. त्यांनी दुकानदाराचे लक्ष विचलित करून डिस्प्ले काउंटरवरील सुमारे ३२ ग्रॅम वजनाच्या आणि सुमारे ३ लाख रुपये किमतीच्या तीन सोनसाखळ्या चोरल्या होत्या. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
काही दिवसांपूर्वी कांदोळी येथील उदय गोल्डस्मिथ ज्वेलरी शॉपमधील चोरीप्रकरणी कळंगुट पोलिसांनी रायगडमधील पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली होती. या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर तो पाहून मोतीलाल लोटलीकर यांनी आपल्या दुकानात चोरी करणारी हीच टोळी असल्याची खात्री केली आणि तातडीने म्हापसा पोलिसांशी संपर्क साधला.
माहितीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी चौकशी केली असता या टोळीतील मनीष मोरे हा कळंगुटमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित नाईक करीत आहेत.
आणखी पाच आरोपींनाही अटक होणार
कळंगुट पोलिसांनी अटक केलेले पांडुरंग गणपत पवार (७६, रा. खर्नाळे, महाड-महाराष्ट्र), मंगेश भाऊ सुर्वे (३५, रा. खर्नाळे, महाड) सतीश नामदेव शिंदे (४१, रा. खर्नाळे, महाड), जोशना आनंद पवार (६५, रा. खर्नाळे, महाड), आणि विमल राजेंद्र जाधव, (६१, रा. सातारा) यांचाही या चोरीत सहभाग असल्याचे समोर आले असून, म्हापसा पोलीस त्यांनाही हस्तांतरण प्रक्रियेद्वारे अटक कणार आहे.            

हेही वाचा
सर्व पहा