विमा कंपनी, अर्जदारामध्ये सामंजस्याने तडजोड

मडगाव : अपघातातील नुकसानभरपाई संदर्भातील दाव्यात अर्जदार आणि विमा कंपनी यांच्यात सामंजस्याने तडजोड झाल्याने मडगाव येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने हे प्रकरण निकाली काढले. या तडजोडीनुसार, ठाणे (महाराष्ट्र) येथील ३३ वर्षीय जोश्ना बोर्जिस यांना २० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीने मान्य केले आहे.
मडगाव येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या पीठासीन अधिकारी शर्मिला पाटील यांच्यासमोर नुकतीच या प्रकरणाची सुनावणी झाली. ठाणे जिल्ह्यातील भाईंदर (पश्चिम) येथील रहिवासी जोश्ना बोर्जिस यांचा ५ फेब्रुवारी २०२४ रोजी अपघात झाला होता. या प्रकरणी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
जोश्ना बोर्जिस यांनी त्यांचे कुलमुखत्यार अँथनी बॅरेटो यांच्या माध्यमातून मडगाव न्यायालयात भरपाईसाठी दावा दाखल केला होता. या दाव्यात कोलकाता येथील वाहनचालक संजय ठाकूर, कुंकळ्ळी येथील वाहनमालक प्रशांत बाबू ताटे आणि गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
मडगाव न्यायालयात दावा निकाली
सुनावणीदरम्यान अर्जदार आणि विमा कंपनी यांच्यात आपापसातील सामंजस्याने तडजोड झाली. या तडजोडीनुसार, जोश्ना बोर्जिस यांना पूर्ण आणि अंतिम तडजोड म्हणून २० लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. ही रक्कम अदा केल्यानंतर विमा कंपनी या प्रकरणातील सर्व दायित्वांतून मुक्त होईल, असे स्पष्ट करण्यात आले. दोन्ही पक्षांनी तडजोड मान्य केल्यानंतर न्यायालयाने दावा निकाली काढला.