अभ्यास मंडळावरील लोकांचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित किंवा एकांगी असेल, तर त्यांनी तो सोडून देऊन गोव्यातील लेखकवर्गाकडे वेगळ्या चष्म्यातून पहावे. आपल्या चष्म्यातून ठराविक लोकांचेच गुण दिसत असतील, तर प्रसंगी असे चष्मे बदलायला हवेत!

गेल्या काही दिवसांपासून 'एससीईआरटी'च्या मराठीच्या पुस्तकांवरून सुरू असलेल्या चर्चेला 'एससीईआरटी'च्या संचालक मेघना शेटगांवकर यांनी तात्पुरता पूर्णविराम दिला. लहान मुलांसाठी लागणारे तयार साहित्य गोव्यातील लेखकांकडून खूप कमी प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे बाहेरील लेखकांच्या साहित्याचा समावेश करावा लागला, पण या पुढे नववी ते बारावीपर्यंत इयत्तांच्या मराठी पुस्तकांत गोव्यातील लेखकांचे साहित्य मोठ्या प्रमाणात येईल, असे सांगून ही चर्चा तात्पुरती थांबवली. मराठी पुस्तकांच्या अभ्यास मंडळावरील काही सदस्यांनी 'एससीईआरटी'ला अंधारात ठेवून आपले ईप्सित साध्य केले. पण 'गोवन वार्ता'ने प्रसिद्ध केलेल्या एका साध्या बातमीमुळे सर्वांचे मुखवटे गळाले. आता पुस्तके छापून आली, ती अभ्यासक्रमातही लागू झाल्यामुळे मागे घेतली जाणार नाहीत, हे जरी खरे असले तरी पुढे जेव्हा अभ्यासक्रम तयार करण्यात येईल किंवा इतर इयत्तांचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू आहे, त्यात गोव्यातील साहित्यिकांना संधी दिली जाईल, असे शेटगांवकर यांनी स्पष्ट केल्यामुळे गोव्यातील लेखकांच्या हक्कासाठीचा हा लढा काही अंशी यशस्वी झाला, असेच म्हणावे लागेल. शेटगांवकर या नागरी सेवेतील अधिकारी आहेत. त्यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे. त्यांनी संपादक मंडळातील लोकांना अभ्यासक्रम तयार करण्यासाठी "सर्वसमावेशक बाबींचा विचार करा आणि डोळ्यावर बांधलेले झापड सोडवून जगाकडे मोठ्या दृष्टिकोनातून पाहा," असा सल्ला द्यावा अन्यथा पुढेही आपल्याच मर्जीतील मारूनमुटकून तयार केलेल्या लेखकांचा भरणा हे लोक करतील.
कोकणीच्या अभ्यासक्रमात गोव्यातीलच लेखकांना स्थान दिले आहे. अवघे काही पाठ अनुवादित किंवा बाहेरील लेखकांचे आहेत. हेच तत्त्व मराठीच्या अभ्यास मंडळाने अवलंबले असते, तर निश्चितच गोव्यातील लेखकांच्या मदतीने मराठीचा अभ्यासक्रम कदाचित जास्त प्रभावी झाला असता. पण अभ्यास मंडळावरील काही लोकांनी आपापल्या लोकांना लेखक म्हणून पुढे करण्यासाठी पाठ्यपुस्तकांसारख्या अत्यंत संवेदनशील गोष्टींचा वापर केला, हे दुर्दैवी आहे. मंडळातील काही सदस्यांनी या कामात स्वहिताचा विचार केला, जे व्हायला नको होते. कोणीतरी आपला मित्र किंवा नातेवाईक डायरी घेऊन कधीतरी कविता म्हणतो, म्हणून त्याला थेट अभ्यासक्रमातच आणण्याचे पाप काही लोकांनी केले. महाराष्ट्रात आपल्या ओळखी आहेत म्हणून त्यांना इकडे संधी द्यावी, असाही विचार काहींनी केला. असे करता करता महाराष्ट्रातील लेखकांचा भरणाच पुस्तकांत जास्त झाला. ज्या मंडळावर काही दिग्गज विभूती संपादक, नियंत्रक म्हणून काम पाहतात त्यांच्या या गोष्टी लक्षात आल्या नाहीत, याचे आश्चर्य वाटते. आता ही पुस्तके छापून आली. त्यावर लाखो रुपये जनतेचे खर्च झाले आहेत त्यामुळे ती जरी मागे घेता येत नसली, तरी भविष्यात गोव्यातील लेखकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. मराठी असो वा कोकणी त्या दोन्हीत गोव्यातील लेखकांचा समावेश असेल, याची काळजी घ्यावी. मग भलेही दहा जणांचे साहित्य फेटाळा, पण चार जणांचे निवडले जावे. दोन्ही भाषेच्या अभ्यास मंडळांवर अनुभवी लोक आहेत. एकमेकांशी चर्चा करून गोव्यातील कुठल्याही भाषेतील लेखकांचे साहित्य अनुवादित करणेही शक्य आहे. आताही अभ्यास मंडळावरील अनेक सदस्य एकमेकांचे साहित्य, पुस्तक, आराखडा पाहून बदल करतात.
गोव्यात फक्त मराठी आणि कोकणीच लेखक आहेत असा समज करून घेऊ नये. हिंदी आणि इंग्रजीत लिखाण करणारे अनेक चांगले, दर्जेदार लेखक गोव्यात आहेत. चारही भाषांतील लेखकांशी चर्चा करणे, त्यांनी लिहिलेले साहित्य अभ्यासणे आणि त्यांना जमेल अशा प्रकारचे काम देणे हे अभ्यास मंडळाचे काम आहे. गोव्यातील काही लेखकांचे इंग्रजी साहित्य हे अत्यंत वास्तववादी आणि प्रभावशाली आहे. जेव्हा महाराष्ट्रातील लेखक घेतले जातात आणि त्याला आक्षेप घेतला जातो, तेव्हा तसा आक्षेप घेणाऱ्यांना डबक्यातले म्हटले जाते. पण आपण अभ्यासक असूनही गोव्यातील लेखकांचे इतर भाषांतील साहित्य पाहत नाही, वाचत नाही याला काय म्हणायचे? किंबहुना त्यांची यादीही तुमच्याकडे नसेल, तर त्याला काय म्हणायचे? अभ्यास मंडळावरील लोकांचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित किंवा एकांगी असेल, तर त्यांनी तो सोडून देऊन गोव्यातील लेखकवर्गाकडे वेगळ्या चष्म्यातून पहावे. आपल्या चष्म्यातून ठराविक लोकांचेच गुण दिसत असतील, तर प्रसंगी असे चष्मे बदलायला हवेत!