Home >> विचार >> 'जीएससीईआरटी'ची पाठ्यपुस्तके नियमांच्या चौकटीतच

'जीएससीईआरटी'ची पाठ्यपुस्तके नियमांच्या चौकटीतच

महाराष्ट्रातील साहित्यिकांचे लेखन समाविष्ट करताना त्या साहित्याला सुद्धा परीक्षण मंडळाच्या चिकित्सात्मक चाळणीतून जावे लागले. आज इतर राज्यांतील अनेक शिक्षक या पाठ्यपुस्तकांसारखी पुस्तके आपल्या राज्यांतही झाली नाही, असे कौतुकास्पद उद्गार काढत आहेत.

Story: विशेष |
28th June, 09:55 pm
'जीएससीईआरटी'ची पाठ्यपुस्तके नियमांच्या चौकटीतच

सध्या गोव्यात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे 'जीएससीईआरटी'ने तयार केलेली मराठी पाठ्यपुस्तके. काही वर्तमानपत्रांचा असा दावा आहे की गोमंतकीय साहित्य वगळण्यात आले आहे. पण तथ्य पाहता गोमंतकीय साहित्य वगळण्यात आले नाही. 'जीएससीईआरटी'ची पाठ्यपुस्तके तयार करताना, पाठ्यक्रमाचे घटक निवडताना काही निकष असतात. या निकषांमध्ये काही साहित्य न बसल्या कारणाने काही लेखकांचे साहित्य समाविष्ट झाले नाही. पण हे जाणून बुजून न करता त्या त्या साहित्यावर व्यवस्थित विचार विनिमय करूनच काही निर्णय घेण्यात आले आहेत, हे पाठ्यपुस्तकाच्या संपादक मंडळातील एक सदस्य म्हणून मी ठामपणे सांगू शकते.

इयत्ता पहिली ते दुसरी, तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी असे विद्यार्थ्यांच्या वयोमान आणि बुद्धीनुसार इयत्तांचे गट होतात. त्या अनुषंगाने साहित्याचा दर्जा ठरवावा लागतो. त्यातही 'आर-वन' आणि 'आर-थ्री' असे दोन स्तर आहेत. या स्तरांनुसार पुन्हा तो पाठ्यक्रम आणि त्याची काठिण्य-पातळी ठरवावी लागते. त्यानंतरच त्यामध्ये समाविष्ट केले जाणारे घटक कोणते असावेत, विद्यार्थ्यांमधील कोणत्या गुणांना चालना देणारे असावेत, त्यातील भाषा कशी असावी, त्या पाठ्यक्रमांचे विषय कसे असावेत या सर्वांवर चिकित्सात्मक विचार करूनच विषय ठरवले जातात. बहुतेक वेळा या विषयावर तयार साहित्य मिळतेच असे नाही. त्यामुळे अनेकदा साहित्य शोधूनही सापडत नसल्यामुळे काही ठिकाणी त्या पुस्तकात बसेल असे साहित्य निर्माण करावे लागते, जे यापूर्वी अभ्यासात असलेल्या इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची पुस्तके होती, त्या पुस्तकांमध्येही तयार केले होते. अशावेळी विशिष्ट वर्गांना शिकवण्याचा अनुभव असलेल्या शिक्षकांनी या लेखनात हातभार लावला असेल, जे कदाचित प्रथितयश लेखक नसतील पण विद्यार्थ्यांची भावनिक गरज त्या शिक्षकांनी हेरली असेल. त्यामुळे जे काही नवोदित लेखक या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहेत, ते गोमंतकीय तर आहेतच पण त्याचबरोबर शिक्षक म्हणून अनुभवी सुद्धा आहेत. काही ठिकाणी नवोदित कवींचे, लेखकांचे साहित्य संपादक मंडळाला भावले असेल. प्रत्येक नवोदित लेखकाने तयार केलेले हे साहित्य ठरवलेल्या अभ्यासक्रमाच्या निकषांमध्ये योग्यरीत्या बसले असेल आणि त्यामुळे ते समाविष्ट झाले असेल. असे एखादे साहित्य पाठ्यपुस्तकात समाविष्ट झाल्यास त्यात काही वावगे नसावे. प्रत्येक वेळी नावाजलेल्या लेखकांचे साहित्य पाठ्यपुस्तकांमध्ये आले तरच ते पाठ्यपुस्तक दर्जेदार होईल, असे म्हणणे योग्य नाही.

महाराष्ट्रातील साहित्यिकांचे लेखन समाविष्ट करताना त्या साहित्याला सुद्धा परीक्षण मंडळाच्या चिकित्सात्मक चाळणीतून जावे लागले. परीक्षण चिकित्सेतून खरे उतरल्यानंतरच त्या साहित्याला पाठ्यपुस्तकांमध्ये स्थान दिले गेले आहे. याचा अनुभव फक्त मराठी पाठ्यपुस्तक साहित्य निर्मिती करणाऱ्या संपादक मंडळांनी घेतला नसून इतर भाषांची पुस्तके तयार करणाऱ्या संपादक मंडळांनाही यांची पुरेपूर जाणीव आहे.

मराठी भाषा ही अभिजात भाषा असल्याकारणाने त्याच्या सीमारेषाही विस्तारित आहेत. त्यामुळे गोमंतकातील मराठी पुस्तक तयार होत असल्याकारणाने शंभर टक्के गोमंतकातीलच मराठी साहित्य घ्यायचे, हा तर्क बरोबर वाटत नाही.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'जीएससीआरटी'ची जी पुस्तके तयार झाली आहेत, त्यामध्ये अभ्यासक्रमचा जो पाठ आहे, तो दुय्यम स्थानावर असून त्या पाठामागचे जे क्रियाकलाप आहेत ते प्रथम स्थानावर आहेत. विद्यार्थ्यांमधील ज्ञान, आकलन, उपयोजन आणि सर्जनशीलता या गुणांना चालना देण्याचे काम पाठाचे क्रियाकलाप करत आहेत. पुस्तकामध्ये समाविष्ट झालेले पाठ आणि त्या मागचे क्रियाकलाप हे एकमेकांना पूरक आहेत का, हे तपासूनच साहित्य निवडण्याचे काम करावे लागते. संपादन मंडळ फक्त अभ्यासक्रमाचे पाठ न निवडता वरील क्रियाकलापांसाठीही त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे गोमंतकीय साहित्यिकांना वगळण्यात आले, अशी एकांगी बातमी तयार न करता ती बातमी परीक्षणात्मक स्वरूपाची असती तर संपादक मंडळ ज्यांनी इतके परिश्रम घेऊन ही पाठ्यपुस्तके तयार केली आहेत, त्यांच्या कष्टाचे चीज झाले असते.

इथे जर कोणी वैयक्तिक संबंधातून पाठ्यपुस्तकातील साहित्य निवडले असेल तर तो निव्वळ त्या विशिष्ट व्यक्तीचा दोष आहे. जे कदाचित 'जीएससीआरटी'च्या आणि परीक्षण मंडळाच्याही नकळत झाले असेल. पण त्यामुळे प्रत्येक संपादक मंडळ आणि त्या संपादन मंडळातील प्रत्येक सदस्याला दोषी ठरवणे हे योग्य आहे का, याचा विचार होणेही गरजेचे आहे.

इयत्ता तिसरीचे आणि इयत्ता सहावीचे पुस्तक हे 'जीएससीआरटी'ने सर्वप्रथम तयार केल्या कारणाने त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत, हे खुद्द 'जीएससीआरटी'ने गेल्या वर्षी कबूल केले होते. त्या त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न उर्वरित पुस्तके तयार करताना काटेकोरपणे केला आहे. गोमंतकीय साहित्य हे पाठ्यपुस्तकात ४० टक्क्यांपेक्षा वर असावे हा जो एक निकष होता, या निकषाला धरूनच सगळीच पुस्तके आहेत. या गोष्टी कोणीही अमान्य करू शकत नाही.

अपार कष्टामधून तयार झालेली ही पाठ्यपुस्तके ही गोव्याची अस्मिता आहे. आज इतर राज्यांतील अनेक शिक्षक या पाठ्यपुस्तकांसारखी पुस्तके आपल्या राज्यांतही झाली नाही, असे कौतुकास्पद उद्गार काढत आहेत.

- गौतमी विठ्ठल गावस

(लेखिका शिक्षिका आहेत.)