
आयर्लंडने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत २-० असा ऐतिहासिक विजय मिळवत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. या विजयासह आयर्लंडने भारताची सलग १६ टी-२० मालिका जिंकण्याची दमदार घोडदौड थांबवली. भारतीय संघासाठी हा पराभव धक्कादायक मानला जात असून संघ निवडीपासून खेळाडूंच्या कामगिरीपर्यंत अनेक मुद्द्यांवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाज अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरले. संजू सॅमसन, श्रेयस अय्यर सारख्या अनुभवी खेळाडूंनी निराशाजनक प्रदर्शन केल्याने संघ व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर यांचीही कामगिरी सुमार झाली. विशेषतः दबावाच्या परिस्थितीत भारतीय फलंदाजांनी विकेट्स गमावल्या, तर गोलंदाजांना आयर्लंडच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आले. गोलंदाजीमध्ये जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची कमतरता प्रकर्षाने जाणवली. परिणामी, तुलनेने कमी अनुभवी असलेल्या आयर्लंड संघाने भारतावर वर्चस्व गाजवत मालिका खिशात घातली.
या पराभवानंतर सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे. अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींनी संघ निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला दोन्ही सामन्यात स्थान न दिल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि युवा स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या वैभवला संधी न देणे कितपत योग्य होते, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा वरिष्ठ खेळाडू सातत्याने अपयशी ठरत आहेत, तेव्हा युवा खेळाडूंना संधी देणे आवश्यक आहे. वैभव सूर्यवंशीसारख्या प्रतिभावान खेळाडूला संधी मिळाली असती, तर तो संघासाठी निर्णायक भूमिका बजावू शकला असता, असे अनेकांचे मत आहे. काही चाहत्यांनी तर संघ व्यवस्थापनाने नवोदित खेळाडूंवर विश्वास दाखविण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, काही क्रिकेट विश्लेषकांनी मात्र संघ व्यवस्थापनाची बाजू घेतली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कोणत्याही युवा खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळविण्यापूर्वी योग्य वेळ आणि परिस्थिती महत्त्वाची असते. केवळ एका मालिकेतील पराभवामुळे निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे ते सांगतात. तरीदेखील, भारताच्या खराब कामगिरीमुळे संघातील बदल अपरिहार्य असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
आयर्लंडचा हा विजय त्यांच्या क्रिकेट इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. जगातील बलाढ्य संघांपैकी एक असलेल्या भारताला पराभूत करून आयर्लंडने आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याचवेळी भारतीय संघासाठी हा पराभव आत्मपरीक्षण करण्याची संधी ठरणार आहे. आगामी मालिकांमध्ये संघ व्यवस्थापन युवा खेळाडूंना अधिक संधी देते का आणि वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळते का, याकडे आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
- प्रवीण साठे