Home >> गोवा >> भविष्यातील जलसंकटावर काढणार तोडगा; गोवा सरकारची विशेष योजना तयार

भविष्यातील जलसंकटावर काढणार तोडगा; गोवा सरकारची विशेष योजना तयार

गोव्यात पाऊस लांबला तरी पाण्याची टंचाई भासणार नाही. मे महिन्यात धरणांमध्ये ३ महिन्यांचा पाणीसाठा ठेवण्याची जलमंत्री सुभाष शिरोडकर यांची घोषणा.

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
53 mins ago
भविष्यातील जलसंकटावर काढणार तोडगा; गोवा सरकारची विशेष योजना तयार

पणजी: हवामान बदल आणि अनिश्चित मान्सूनमुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी गोवा सरकारने आतापासूनच पूर्वतयारी सुरू केली आहे. पावसाला कितीही उशीर झाला, तरी गोवेकरांना पाण्याचा तुटवडा जाणवू नये म्हणून मे महिन्यातच धरणांमध्ये पुढील ३ महिने पुरेल इतका अतिरिक्त पाणीसाठा ठेवण्याचा मास्टरप्लॅन सरकारने तयार केला आहे. जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी या विशेष जल-नियोजनाची घोषणा केली. एवढ्यावरच न थांबता, भूगर्भातील पाण्याचा बेकायदेशीर उपसा करणाऱ्या कूपनलिकांवर (बोरवेल्स) ऑगस्टपासून कडक कारवाई केली जाईल आणि त्या तात्काळ सील केल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

यावर्षी पाऊस बराच उशिरा सुरू झाला; त्यामुळे साळावली, अंजुणे यांसारख्या प्रमुख धरणांमधील पाणीपातळी खूप खालावली होती. 'पाणी संपले तर काय?' या चिंतेने गोवेकरांचे टेन्शन वाढवले होते. सुदैवाने आता पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा पुन्हा वाढू लागला आहे. परंतु, भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, म्हणून मे महिन्यानंतर पुढील दोन ते तीन महिने पुरेल एवढे पाणी धरणांमध्ये साठवून ठेवण्यासाठी एक ठोस आणि आधुनिक धोरण आणले जात आहे.

दुसरीकडे, पाण्याचा बेसुमार आणि अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर आता कडक नजर ठेवली जाईल. चिंबल येथील बेकायदेशीर बोरवेल्सवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश थेट उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्देशानंतर प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असून, ऑगस्ट महिन्यापासून राज्यातील सर्व बेकायदा बोरवेल्स सील करण्याची धडक मोहीम राबवली जाणार आहे. जलव्यवस्थापन (वॉटर मॅनेजमेंट) सुधारण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तरुणांनीही या जनजागृती मोहिमेत पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा