Home >> गोवा >> थोरियम ऊर्जा तयार करण्यासाठी भारताला मोठी संधी : डॉ. काकोडकर

थोरियम ऊर्जा तयार करण्यासाठी भारताला मोठी संधी : डॉ. काकोडकर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
थोरियम ऊर्जा तयार करण्यासाठी भारताला मोठी संधी :  डॉ. काकोडकर

पणजीः जगात सर्वात जास्त थोरियमचे साठे भारतात आहेत. एकदा आम्ही थोरियम पासून ऊर्जा तयार करण्याचे तंत्रज्ञान हाताळले की, आमच्या भविष्यातील सर्व ऊर्जेच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. आणि भारत जगातील ओपेक देशांमधील एक देश होऊ शकतो. जगातील कुठल्याही इतर देशांकडे हे तंत्रज्ञान सध्या तरी नाही. त्यासाठी हे तंत्रज्ञान प्रथम तयार करून भारताला जगाचा पाठलाग करण्याऐवजी नेतृत्त्व करण्याची एक मोठी संधी आहे, असे नामांकित वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले. 

गोवा विद्यापिठाने आपला ४२ वा स्थापना दिन साजरा केला. यावेळी भारतीय अणू ऊर्जा आयोगाचे सदस्य, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष आणि होमी भाभा नॅशनल इन्स्टीट्यूटचे कुलपती पद्मविभूषण अनिल काकोडकर या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘उच्च शिक्षण आणि राष्ट्र विकास’ या विषयावर त्यांचा परिसंवाद झाला. यावेळी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन आणि निबंधक सुंदर धुरी उपस्थित होते. 

भारताला जर बळकट आणि मोठा देश म्हणून जागा मिळवायची असेल तर स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारावर जगात प्रथमच आणि मोठा प्रभाव टाकणारा नवा शोध लावावा लागेल, असे काकोडकर यांनी सांगितले. 

भारताच्या अणुऊर्जेच्या प्रवासावर बोलताना डॉ. काकोडकर यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय निर्बंध असताना सुद्धा भारताने आपल्या बळावर ‘प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर’ (PHWR) तंत्रज्ञानावर मिळवलेला विजय आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. भारताने केवळ प्रगत तंत्रज्ञान मिळवले नाही, तर जग भारताला एक ‘जबाबदार देश’ म्हणून ओळखतो. आणि हे तंत्रज्ञान माणसाच्या सुसंस्कृत आणि प्रगल्भ वर्तणुकीमुळे साध्य झाले आहे.

कुठल्याही देशाला मिळणारी प्रतिष्ठा आणि त्याचे बलस्थान केवळ पैशाच्या श्रीमंतीवर ठरत नाही, तर ते त्याच्या सातत्याने चालू असलेल्या तंत्रज्ञानाच्या मोठेपणावर ठरते. रशियेपेक्षा जग अमेरिकेला जास्त मान देते; कारण अमेरिकेची आर्थ‌िक सत्ता प्रगत तंत्रज्ञानावर उभी आहे, असे काकोडकर यांनी सांगितले.   

लष्करी, आर्थ‌िक बळासाठी तंत्रज्ञानाचे सामर्थ्य महत्त्वाचे 

‘‘लष्करी आणि आर्थ‌िक बळासाठी तंत्रज्ञानाचे सामर्थ्य महत्त्वाचे आहे. देशाला तंत्रज्ञानाचा शोध सातत्याने आणि कायमचा लावावा लागणार. हा भू-राजकीय आणि विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी भारताच्या उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्राला जगात प्रथम क्रमांकावर आणणे, हाच एकमेव मार्ग आहे’’, असे मत काकोडकर यांनी व्यक्त केले. 

 शिक्षणाबाबतीत गोवा जास्त नशिबवान 

पुढील दिशेने पाऊल मारण्यासाठी मदत करणारे दोन खास आणि सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. शिक्षणाच्या बाबती पहायला गेल्यास, गोवा हे जास्त नशिबवान असे मला वाटते. शिक्षणाचे सर्वच आयाम खूप महत्त्वाचे आहेत. पण उच्च शिक्षण संस्थांबाबतीत गोव्यात अशा संस्थांची संख्या कदाचित खूप जास्त आहे. येथे गोवा विद्यापीठ, आयआयटी, एनआयटी, बिट्स पिलानी आणि त्याचप्रमाणे आयुर्वेद, वैद्यकीय, अभ‌ियांत्रिकी, मॅनेजमेंट आणि इतर कित्येक क्षेत्रातील संस्था आहेत. 



हेही वाचा
सर्व पहा