Home >> गोवा >> वास्कोतील खारीवाडा येथे मच्छीमार जेटीचा भाग कोसळला; मच्छीमारांमध्ये घबराट

वास्कोतील खारीवाडा येथे मच्छीमार जेटीचा भाग कोसळला; मच्छीमारांमध्ये घबराट

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
वास्कोतील खारीवाडा येथे मच्छीमार जेटीचा भाग कोसळला; मच्छीमारांमध्ये घबराट

वास्को : मुसळधार पाऊस आणि पाण्याची पातळी वाढल्याने खारीवाडा येथील मच्छीमारी जेटीचा एक भाग कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक मच्छीमारांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक मच्छीमारांनी सांगितले की, जेटीचा कोसळलेला भाग धोकादायक बनला असून सध्याची जेटी परिसरातील सुमारे २५० मासेमारी नौकांसाठी अपुरी पडत आहे. जागेअभावी अनेक नौका जेटीबाहेर नांगराव्या लागत आहेत. विशेषतः मान्सून काळात उग्र समुद्रामुळे त्यांचे वारंवार नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मच्छीमारांचे म्हणणे आहे की,  गेल्या अनेक वर्षांपासून जेटीचा विस्तार व मजबुतीकरण करण्यासाठी शासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली.  मात्र केवळ आश्वासने मिळाली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी शासनाकडे कोसळलेल्या भागाची तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच मोठी, मजबूत आधुनिक मासेमारी जेटी बांधून देण्याची मागणी केली आहे. यामुळे नौकांची सुरक्षितता, मच्छीमारांचे उपजीविकेचे संरक्षण आणि स्थानिक मत्स्यव्यवसायाला चालना मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. मान्सून हंगाम सुरू असताना या कामात आणखी विलंब झाल्यास मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही मच्छीमारांनी दिला आहे.

हेही वाचा
सर्व पहा