Home >> गोवा >> कांपाल क्रीडा संकुलाचे खासगीकरण करण्याविरोधात काँग्रेसचा एल्गार

कांपाल क्रीडा संकुलाचे खासगीकरण करण्याविरोधात काँग्रेसचा एल्गार

राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा : ‘जीसुडा’च्या कार्यालयावर धडक, अधिकाऱ्यांना घेराव

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
01st July, 11:25 pm
कांपाल क्रीडा संकुलाचे खासगीकरण करण्याविरोधात काँग्रेसचा एल्गार

पणजी : कांपाल पणजी येथील नव्याने विकसित करण्यात आलेले फुटबॉल मैदान व क्रीडा संकुल खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या भाजप सरकारच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आंदोलन करत हा निर्णय तत्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला.

मीडिया व कम्युनिकेशन्स विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, प्रवक्ते ॲड. अमित पालेकर, काँग्रेस नेते जनार्दन भंडारी, युवक काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतीक्षा खलप, सेवा दल प्रमुख राजन घाटे, समिल वळवईकर, लिओनिड फुर्तादो, बाबी बागकर, नितीन चोपडेकर, साविओ कुतिन्हो, राजेश वेरेकर, हिमांशू तिवरेकर, शेख हसन मन्सूर, नौशाद चौधरी, ट्रेव्हर फर्नांडिस, मंगलदास नाईक, चंदन मांद्रेकर, गजानंद तिळवे, योगेश गोवेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, सेबी मिनेझिस तसेच शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोवा राज्य नागरी विकास संस्था (जीसुडा) कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांचा घेराव घातला आणि प्रस्तावित भाडेकरार तत्काळ रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

ॲड. अमित पालेकर यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सरकारने सार्वजनिक मालमत्ता खासगी हितसंबंधांसाठी विकण्याचा उद्योग सुरू केल्याचा आरोप केला. पणजीतील एकामागून एक सार्वजनिक मालमत्ता व्यावसायिक हितसंबंधांसाठी दिली जात आहे. कॅप्टन ऑफ पोर्ट्सची नवीन इमारतही कॅसिनोंना दिली तरी आश्चर्य वाटणार नाही. आता त्यांची नजर कांपाल मैदानावर आहे. गोव्याचे भविष्य विकण्याचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सरकारच्या भूमिकेतील विसंगतीवर टीका करत त्यांनी सांगितले की, क्रीडा खाते, जीसुडा, पणजी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासन यापैकी एकही विभाग जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. प्रत्येक विभाग जबाबदारी झटकत आहे. यावरूनच काहीतरी काळेबेरे असल्याचे स्पष्ट होते. गोव्याच्या युवकांच्या भवितव्याशी भाजपला फुटबॉल खेळू देणार नाही.

अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकारवर खासगीकरणाच्या हव्यासाचा आरोप केला. भाजप सरकारसाठी प्रत्येक सार्वजनिक मालमत्ता हा व्यवसायाचा विषय बनला आहे. कांपाल मैदान गोव्याच्या जनतेचे आहे, कोणत्याही खासगी कंपनीचे नाही. गोव्याच्या युवकांचा क्रीडा हक्क हिरावून घेण्याचा प्रत्येक प्रयत्न काँग्रेस हाणून पाडेल. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

अर्चित नाईक यांनी भाजप सरकारवर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

क्रीडा संकुलाचा ताबा ‘साग’कडे द्यावा!

माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी कांपाल क्रीडा संकुलाचा ताबा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा (साग) कडे द्यावा आणि पणजी तसेच परिसरातील नागरिकांसाठी सर्व क्रीडा सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली. 

हेही वाचा
सर्व पहा