म्हणाले-शाश्वत विकास केवळ भाजपच करू शकतो यावर जनतेचा विश्वास

मडगाव : भारतीय जनता पक्षाने (भाजप) केलेला विकास आज जनतेसमोर आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. काही नेत्यांना केवळ निवडणुका जवळ आल्या की जनतेची आठवण येते. त्यामुळे आगामी निवडणुकीत समोर कुणीही उमेदवार असला, तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. नावेली मतदारसंघात पुन्हा कमळच फुलणार आणि राज्यातही भाजपचेच सरकार येणार, असा ठाम विश्वास नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी व्यक्त केला.
नावेली विधानसभा मतदारसंघात सध्या अनेक इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये चर्चिल आलेमाव यांची कन्या वालंका आलेमाव, 'आप'मधून राजीनामा दिलेले सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश भगत, तसेच काँग्रेस सोडून गेल्या निवडणुकीत 'आप'कडून नशीब आजमावणाऱ्या आणि आता पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करत असलेल्या अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांच्या नावांचा समावेश आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार उल्हास तुयेकर यांना विचारले असता त्यांनी विरोधकांना स्पष्ट टोला लगावला. ते म्हणाले की, लोकशाहीत कुणालाही निवडणूक लढवण्यापासून रोखता येत नाही. मात्र, मतदारसंघातील जनता काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते.
आपल्या कार्यकाळातील कामांचा पाढा वाचताना आमदार तुयेकर म्हणाले, "भाजपचा आमदार या नात्याने मी नावेली आणि दवर्ली परिसरात अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लावली आहेत. यापूर्वी जेव्हा आवेर्तान फुर्तादो भाजपमध्ये होते, तेव्हा दवर्ली परिसरात दोन मैदानांची उभारणी झाली आणि दवर्ली चर्चजवळ कम्युनिटी हॉल निर्माण करण्यात आला. गेल्या चार वर्षांत आमदार म्हणून काम करताना मी जनतेच्या सुख-दुःखात धावून गेलो आहे. या भागात भूमिगत वीजवाहिन्यांचे (अंडरग्राउंड केबलिंग) काम पूर्ण केले आहे. केवळ भाजपच शाश्वत विकास करू शकतो, याची जनतेला पूर्ण खात्री पटली आहे.
ते पुढे म्हणाले की, निवडणुका तोंडावर आल्याने काही नेते आता सक्रिय झाले आहेत. पण भाजप केवळ निवडणुकां पुरता मर्यादित नसून, आमचे कार्यकर्ते वर्षभर लोकांच्या सेवेत कार्यरत असतात. प्रतिमा कुतिन्हो आणि वालंका आलेमाव यांनी मागील विधानसभा निवडणूकही लढवली होती, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीने भाजपला कोणताही फरक पडणार नाही. आमच्या बूथ कमिट्या तळागाळात मजबूत आहेत. कार्यकर्त्यांच्या जोरावर नावेलीची जागा आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू आणि गोव्यात पुन्हा एकदा भाजपचेच पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येईल.