Home >> गुन्हे >> कळंगुटमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! एका महिलेची सुटका, एका दलालास अटक

कळंगुटमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! एका महिलेची सुटका, एका दलालास अटक

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेची धडक कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
37 mins ago
कळंगुटमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! एका महिलेची सुटका, एका दलालास अटक

पणजी : गोव्यातील कळंगूट या प्रसिद्ध पर्यटनस्थळाजवळ एका मानवी तस्करी (ह्युमन ट्रॅफिकिंग) रॅकेटचा पर्दाफाश करण्यात गोवा पोलिसांच्या क्राइम ब्रँचला मोठे यश आले आहे. २ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने टाकलेल्या छाप्यात एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, तेलंगणा मूळ असलेल्या एका मुख्य संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

क्राइम ब्रँचचे पोलीस अधीक्षक (SP) जिवबा दळवी यांच्या थेट देखरेखीखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. पोलिसांना कलंगूट येथील 'पामीर्ना रिसॉर्ट' परिसरात एक महिला वेश्याव्यवसायासाठी आणली जाणार असल्याची खात्रीशीर आणि गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. पहाटे दोन ते चार वाजेच्या दरम्यान संशयित पुन्ना हरी प्रसाद (वय ३३ वर्षे, मूळ रा. यादाद्री भुवनगिरी, तेलंगणा, सध्या रा. हडफडे-गोवा) हा काळ्या रंगाच्या फॅसिनो स्कूटरवरून तिथे पोहोचला. तो ग्राहकांशी सौदा करून पीडित महिलेला त्यांच्या स्वाधीन करणार तितक्यात दबा धरून बसलेल्या क्राइम ब्रँचच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

पोलिसांनी घटनास्थळावरून पीडित महिलेची सुरक्षित सुटका केली असून तिला कायदेशीर संरक्षणात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विकास देयकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्‍ह्याची नोंद करण्यात आली आहे. संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १४३, १४३(१), १४३(२) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (ITPA), १९५६ च्या कलम ४, ५ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक विकास देयकर, तुषार लोटलीकर, महेश गडेकर, एएसआय अशोक गावडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विशाल नाईक, कल्पेश तोरस्कर, रोशनी शिरोडकर, सेजल दळवी तसेच 'अर्ज' (ARZ) या सेवाभावी संस्थेच्या स्नेहा चारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य पातळीवर पसरले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा