Home >> देश -परदेश >> बंगळुरूत आयटी कंपनीच्या डे-केअर सेंटरमध्ये चिमुरड्यांवर अमानुष अत्याचार

बंगळुरूत आयटी कंपनीच्या डे-केअर सेंटरमध्ये चिमुरड्यांवर अमानुष अत्याचार

पाच महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
2 hours ago
बंगळुरूत आयटी कंपनीच्या डे-केअर सेंटरमध्ये चिमुरड्यांवर अमानुष अत्याचार

बंगळुरू : येथील ब्रुकफील्ड भागातील 'कॅपजेमिनी' (Capgemini) या नामवंत आयटी कंपनीच्या कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या डे-केअर सेंटरमध्ये २ ते ३ वर्षांच्या लहान मुलांवर अत्यंत अमानुष आणि क्रूर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी डे-केअर सेंटरमधील पाच महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंजुला, विजयलक्ष्मी, भवानी, सिंधू आणि बिंदू अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलांची नावे आहेत. या डे-केअर सेंटरमध्ये कंपनीतील कर्मचारी कामाच्या वेळेत आपल्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी ठेवतात. चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचाराचे काही व्हिडिओ व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. डे-केअरमधीलच एका कर्मचाऱ्याने हे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते, ज्याच्या मैत्रिणीला काही दिवसांपूर्वीच या सेंटरमधून कामावरून काढून टाकण्यात आले होते.

व्हायरल व्हिडिओमध्ये या महिला कर्मचारी चिमुरड्यांना घाबरवताना आणि धमकावताना दिसत आहेत. मुलांना वेस्टर्न टॉयलेटवर बसवून त्यांच्या तोंडावर टॉयलेट जेट स्प्रेने पाण्याचा मारा करण्यात आला. तसेच त्यांना बाथरुममध्ये बंद करून शांत राहण्यासाठी धमकावण्यात आले. हे क्रूर व्हिडिओ हाती आल्यानंतर 'चाइल्ड हेल्पलाइन'च्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली.

चाइल्ड हेल्पलाइनच्या तक्रारीवरून पोलिसांनी १ जुलै रोजी कंपनी परिसरातील डे-केअर सेंटरची पाहणी केली. पोलिसांनी या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून संशयित महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, सर्व संशयितांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात येणार आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून बंगळुरू कॅम्पसमधील हे डे-केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे. यापूर्वीही मुलांसोबत असा गैरप्रकार घडला होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा