फिजिक्सवालाकडून शिक्षकांना १५ लाखापर्यंत बंपर ऑफर

नवी दिल्ली : महाराष्ट्रात नीट, टीईटी यासारख्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर शिक्षणाचे झालेले व्यापारीकरण व एकूण पैशांची उलाढाल यातून शिक्षणाचे झालेल्या व्यावसायिकरणाचा भयाण चेहरा पुढे आला होता. आता कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थी पळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. देशातील आघाडीच्या एडटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या फिजिक्सवालाने ( PhysicsWallah) आपल्या ऑफलाइन कोचिंग व्यवसायाच्या विस्तारासाठी नवी प्रोत्साहन योजना लागू केल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांनी किंवा टॅलेंट नर्चर टीम (TNT) सदस्यांनी शिफारस केलेल्या विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीटसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना २ लाखांपासून ते १५ लाखांपर्यंतचे बक्षीस दिले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही योजना विशेषतः नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसाठी असून, त्यांनी पूर्वीच्या संस्थांमधील विद्यार्थ्यांना फिजिक्सवालाच्या वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असा तिचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार बक्षिसांची रक्कम निश्चित केली जाणार आहे.
दरम्यान, कंपनीने ही योजना नवीन नसल्याचे स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा सन्मान आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या पुरस्कार योजनांचे वेळोवेळी पुनरावलोकन व अद्ययावतीकरण केले जाते, असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
कोचिंग संस्थांमध्ये स्पर्धा तीव्र होणार
मात्र, उद्योग क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या मते, नव्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना सोबत आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या या धोरणामुळे विविध कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेषतः भारतासह संयुक्त अरब अमिरातीतील ऑफलाइन केंद्रांचा विस्तार करण्याच्या कंपनीच्या रणनीतीच्या पार्श्वभूमीवर या योजनेकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.