Home >> गुन्हे >> लुथरा बंधूंसह पाच जणांविरुद्ध २३०६ पानी आरोपपत्र सादर

लुथरा बंधूंसह पाच जणांविरुद्ध २३०६ पानी आरोपपत्र सादर

५० साक्षीदारांचा समावेश : बर्च क्लब बनावट आरोग्य दाखला प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
लुथरा बंधूंसह पाच जणांविरुद्ध २३०६ पानी आरोपपत्र सादर

म्हापसा : हडफडे येथील दुर्घटनाग्रस्त बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबला उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट नाहरकत दाखला तयार करण्यात आला होता. या बनावटगिरी प्रकरणी म्हापसा पोलिसांनी क्लबचे मालक लुथरा बंधू व अजय गुप्तासह एकूण ५ जणांविरुद्ध म्हापसा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ५० साक्षिदारांच्या साक्षीसह २,३०६ पानी हे आरोपपत्र आहे.
पोलिसांनी जीएस हॉस्पिलिटी एलएलपी या कंपनीचे अधिकृत मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा व अजय गुप्ता यांच्यासह क्लबचे अधिकारी दिनेश खेरा व गोवा अबकारी खात्याचे वरिष्ठ कारकून गौरेश गावस यांच्याविरुद्ध हे सखोल चौकशीअंती आरोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुप्ता व लुथरा बंधूंना अटक केली होती. तर संशयित खेरा व गावस यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता.
दरम्यान, बर्च क्लब आग दुर्घटनेच्या चौकशीवेळी हणजूण पोलिसांच्या निदर्शनास हा बनावटगिरीचा प्रकार आला होता. त्यानंतर कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी म्हापसा पोलिसांत १७ डिसेंबर २०२५ रोजी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. हा प्रकार १३ डिसेंबरपूर्वी अकबारी खात्याच्या म्हापसा निरीक्षक कार्यालयात घडला होता. पोलिसांनी भा. न्या. सं.च्या ३३२(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३१८(४) व ३(५) कलमान्वये संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता.
दरम्यान, साकवाडी हडफडे येथील सर्वे क्र. १५९/० मधील घर क्र. ५०२/१ मध्ये चालणाऱ्या जीएस हॉस्पिलिटी एलएलपी कंपनीच्या बर्च क्लबसाठी उत्पादन शुल्क परवाना मिळवण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी समान हेतूने जाणूनबुजून आणि अप्रमाणिकपणे कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) तयार केले. ज्यात संशयितांनी फिर्यादींची नक्कल करून सही बनावट केली व रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर केला होता.
अबकारी खात्याची, फिर्यादींची फसवणूक
कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट दाखला खरा असल्याचे भासवून तो म्हापसा येथील उत्पादन शुल्क खात्याकडे सादर करण्यात आला. जेणेकरून उत्पादन शुल्क परवान्यासाठी कागदोपत्री व्यवहार पूर्ण करता येईल आणि संशयित आरोपी हे हा उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यात यशस्वी झाले. मात्र, पोलीस तपासात हा संपूर्ण कट उघडकीस आला असून, संशयितांनी फिर्यादी तसेच अकबारी अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे आरोपपत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.       

हेही वाचा
सर्व पहा