फोंडा तालुक्यातील ३६ वर्षीय महिलेला अज्ञाताकडून गंडा

पणजी : फेसबुकवर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत फोंडा तालुक्यातील ३६ वर्षीय महिलेची २१.६४ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल ते २४ जून २०२६ या कालावधीत एका व्यक्तीने फेसबुकवरून फोंडा तालुक्यातील संबंधित महिलेशी संपर्क साधला. त्याने स्वतःची ओळख रोहित सुरानी अशी करून आपण विदेशात असल्याचे सांगितले. त्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे संवाद वाढवत मैत्री केली.
काही दिवसांनी संबंधित व्यक्तीने विदेशातून पार्सल पाठवल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने तक्रारदार महिलेशी संपर्क साधून त्या पार्सलमध्ये बेकायदेशीर रक्कम असल्याचा दावा केला. तसेच तिच्याविरुद्ध फौजदारी कारवाई होणार असल्याची भीती दाखवून प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यांमध्ये २१ लाख ६४ हजार ५०० रुपये जमा करण्यास भाग पाडले. सदर व्यक्तीने तक्रारदाराला +४४७४१८९४१६३६, ८९७४३४०९६१ या क्रमांकावरून संपर्क साधले होते.
सायबर पोलिसांकडून तपास सुरू
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपींविरुद्ध भा. न्या. संं.च्या ३१८(४), ३१९(२) आरडब्ल्यू ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.