कळंगुटमधील घटना : संशयित महिलेच्या शोधार्थ पोलीस मंगळुरूत

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : कळंगुट येथील रिसॉर्टमध्ये उडुपी (कर्नाटक) येथील वॉटर स्पोर्टस् बोट व्यावसायिक संदीप सलायम मालपे (४२) याचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. संदीप हा कर्नाटकातील माजी मंत्र्याचा वाहनचालक आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, संदीपची सोनसाखळी आणि पाकीट गायब असल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयित महिलेच्या शोधार्थ पोलीस पथक मंगळुरूला रवाना झाले आहे.
संदीप मालपे १८ वर्षांपूर्वी कर्नाटकच्या माजी मंत्र्याचा वाहनचालक म्हणून नोकरी करत होता. नोकरी सोडून तो वॉटर स्पोर्टस् बोट या पर्यटन व्यवसायात उतरला होता. त्याच्या मृत्यूची घटना मंगळवारी रात्री १०च्या सुमारास उघडकीस आली. संदीप रिसॉर्टच्या खोलीत मृतावस्थेत सापडल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. कळंगुटचे पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर व उपनिरीक्षक परेश सिनारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संदीपचे भाऊ आणि मित्रांनी त्याच्या अंगावरील सोनसाखळी आणि त्याचे पाकीट गायब असल्याचे पोलिसांना सांगितले. हा घातपाताच प्रकार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. शिवाय संदीपसोबत हॉटेलवर आलेली महिला गायब होती. पोलिसांनी मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉत शवविच्छेदनासाठी पाठवला होता. बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाले. मात्र, डॉक्टरांनी अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी व्हिसेरा राखून ठेवला आहे.
रविवार, २८ रोजी संदीप मालपे भावंडे व मित्रांसोबत उडुपीहून गोव्यात पर्यटनासाठी आला होता. ते सर्वजण कळंगुटमध्ये एका हॉटेलमध्ये उतरले होते. सोमवारी रात्री ते पणजीतील कॅसिनोमध्ये गेले. तिथून मंगळवारी सकाळी सर्वजण कळंगुटमध्ये परतले. संदीप याच्याशी कॅसिनोमध्ये संशयित महिलेची ओळख झाली. ती महिला संदीपसोबत होती. त्यामुळे तो तिच्यासोबत रिसॉर्टमध्ये उतरला. त्याचे भाऊ व मित्र त्यांच्या हॉटेलमध्ये राहायला गेले.
रिसॉर्टमध्ये संदीप संशयित महिलेला घेऊन मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास चेक इन झाला होता. सायंकाळी ६ च्या सुमारास संदीप फोन उचलत नसल्याचे पाहून त्याच्यासोबत आलेले मित्र रिसॉर्टवर आले. त्यांनी रिसॉर्ट व्यवस्थापनाला संदीप फोन उचलत नसल्याचे सांगितले; पण रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खोलीमध्ये जाण्यास नकार दिला. त्यामुळे ते माघारी परतले. त्यापूर्वी सायंकाळी ४ च्या सुमारास संदीपसोबत असलेली ती महिला हॉटेलमधून बाहेर पडली होती. रिसॉर्टच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती बाहेर पडताना दिसत आहे. वारंवार फोन करूनही संदीप फोन उचलत नसल्याने त्याचे मित्र रात्री पुन्हा रिसॉर्टवर आले. त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला विनंती केली असता खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा संदीप बेडवर निपचित पडल्याचे आढळले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पोलीस करत आहेत.
संदीपने अतिमद्यपान केल्याचे स्पष्ट
पंचनाम्यावेळी पोलिसांना खोलीमध्ये सिगारेट आणि दारूच्या बाटल्या सापडल्या. संदीपने कॅसिनो आणि हॉटेलमध्ये बरेच मद्यपान केल्याचे चौकशीत दिसून आले. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट केले नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
संशयित महिलेचे गोव्याबाहेर पलायन
संशयित महिला बेपत्ता आहे. संदीपच्या अंगावरील वस्तूही गायब असल्याने पोलिसांचा घातपाताचा संशय आहे. संशयित महिलेने घटनेनंतर गोव्याबाहेर पलायन केल्याचेही पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सदर महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. तिच्या शोधार्थ पोलीस पथक कर्नाटकमध्ये पाठवले आहे.