Home >> ताज्या बातम्या >> नावेली मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता

नावेली मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता

विधानसभेचा आखाडा : नावेली

Story: अजय लाड |
01st July, 10:50 pm
नावेली मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता

मतांचे विभाजन झाल्यास पुन्हा भाजपला फायदा

काँग्रेसचा गड मागील निवडणुकीत ढासळला

राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक नेत्यांच्या चेहऱ्यावर भर

मडगाव : सासष्टी तालुक्यातील नावेली मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जात होता. त्याच मतदारसंघात भाजपने मागील निवडणुकीत झेंडा फडकवला. यावेळी माजी जिल्हा पंंचायत सदस्य एडविन कार्दोज यांच्यासह अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो, सिद्धेश भगत, वालंका आलेमाव असे अनेक उमेदवार इच्छुक असून भाजपला पुन्हा जिंकण्यासाठी यांना टक्कर द्यावी लागेल. पारंपरिकपणे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नावेली मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच विजय मिळवून इतिहास रचला. हा विजय भाजपच्या ताकदीपेक्षा विरोधी मतांच्या विभाजनामुळे झाला असल्याने आगामी निवडणुकीत येथील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होणार आहे.


उल्हास तुयेकर
नावेली हा प्रामुख्याने ख्रिश्चनबहुल मतदारसंघ आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा मतदारसंघ काँग्रेस आणि भाजपविरोधी विचारसरणीचा असून माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी तब्बल सातवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनीही २००७ मध्ये नावेली मतदारसंघातून विजय मिळवला होता. नावेलीतील मतदारांचा कल नेहमीच धर्मनिरपेक्ष पक्षांकडे आणि प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यांवर राहिला आहे. मागील काही वर्षांत येथील मतदारांमध्ये राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक नेत्यांच्या चेहर्‍यावर जास्त भर देण्यात येत असल्याचे दिसते.
नावेली मतदारसंघातील गेल्या दोन निवडणुकांचे कल अत्यंत नाट्यमय आणि लक्षवेधी राहिले आहेत. २०१७ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी अपक्ष उमेदवार आवेर्तान फुर्तादो यांचा २,४७८ मतांच्या फरकाने पराभव केला. फालेरो यांना ८‍,१८३ मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपने आपला उमेदवार उभा केला नव्हता. माजी जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोज यांना ३,०२७ मते मिळाली. सत्यविजय नाईक यांनी मगो पक्षाकडून निवडणूक लढवली व त्यांना १,७९८ मते मिळाली. गोवा विकास पार्टीच्या क्रूझ बार्रेटो यांना ८३९ मते मिळाली होती.

वालंका आलेमाव

२०२२ च्या निवडणुकीत लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस सोडल्यामुळे हा मतदारसंघ पोरका झाला आणि काँग्रेसच्या एकगठ्ठा मतांचे विभाजन झाले. याचा थेट फायदा भाजपचे उमेदवार उल्हास तुयेकर यांना झाला. त्यांनी ५,१६८ मते म्हणजे २४.४२ टक्के मते मिळवून ४३० मताधिक्क्याने विजय मिळवला. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या वालंका आलेमाव यांना ४,७३८ मते, काँग्रेसचे आवेर्तान फुर्तादो यांना ३,८०६ मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रेहान मुजावर यांना २,६२२ मते, आपच्या उमेदवार प्रतिमा कुतिन्हो यांना २,३२७ मते आणि आरजीपीचे बेंटो डिसिल्व्हा यांना २,०८६ मते मिळाली होती. भाजपविरोधी उमेदवारांची मते एकत्र केली तर ती जवळपास ७५ टक्के होतात. मतविभागल्यामुळे भाजपने केवळ ४३० मतांच्या फरकाने हा मतदारसंघ पहिल्यांदाच आपल्या खिशात घातला.

नावेलीमध्ये पुन्हा एकदा बहुरंगी लढत पाहायला मिळू शकते. उल्हास तुयेकर भाजपचे विद्यमान आमदार म्हणून ते पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरतील. विरोधक पुन्हा विभागले जातील, यावर भाजपची गणिते अवलंबून असतील. वालंका आलेमाव मागील निवडणुकीत दुुसर्‍या क्रमांकावर राहिल्या होत्या. त्यांच्यामागे चर्चिल आलेमाव आपली पूर्ण पूर्ण ताकद लावण्याची शक्यता आहे. आलेमाव कुटुंबाचा नावेलीतही मोठा मतदारवर्ग आहे.


प्रतिमा कुतिन्हो
काँग्रेसकडून गमावलेला बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी आवेर्तान फुर्तादो, एडविन कार्दोज किंवा एखाद्या नव्या चेहर्‍याला संधी देण्याची शक्यता आहे. प्रतिमा कुतिन्हो निवडणूक लढतील हे त्यांच्या कार्यपद्धतीवरून स्पष्ट असून कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढतील, हे निवडणुकीआधीच समजेल. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाकडून उमेदवार दिला जाऊ शकतो पण सध्या अंतर्गत वादामुळे पक्षाला स्थिरता मिळण्याची गरज आहे. या मतदारसंघात कचर्‍याचा प्रश्न महत्त्वाचा असून त्यावर योग्य उपाययोजनांची मागणी होत आहे.


सिद्धेश भगत
काँग्रेसच्या तिकिटाची अनेकांना अपेक्षा
आगामी निवडणुकीत पुन्हा राजकीय गणिते बदललेली आहेत. भाजप पुन्हा हा मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी ‘आप’ला रामराम करत लोकांचे प्रश्न घेत काम सुरू ठेवले आहे. सिद्धेश भगत यांनीही ‘आप’चा राजीनामा देऊन जनसेवा करण्यावर भर दिला आहे. एडविन कार्दोज यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत पुतणी मलिफा कार्दोज यांना विजय मिळवून दिला आहे. आता ते काँग्रेसच्या तिकिटासाठी प्रयत्नरत आहेत. माजी आमदार आवेर्तान फुर्तादो हेदेखील पुन्हा निवडणूक लढवू शकतात. चर्चिल आलेमाव यांची मुलगी वालंका आलेमाव यांनीही फुटबॉल शिबिर, आरोग्य शिबिर घेत नावेलीत काम सुरू केले असून चर्चिल आलेमाव यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. त्यामुळे अनेक अंदाज वर्तवले जात आहेत.
भाजपच्या उल्हास तुयेकरांना विकासकामे तारतील का ?
नावेलीतील भाजपचे पहिले आमदार म्हणून उल्हास तुयेकर यांनी मतदारसंघात पक्षाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. वेस्टर्न बायपास रस्ता आणि त्याखालील भुयारी मार्गांनजीकचे गतिरोधक, नावेलीतील कचरा प्रश्न यावर त्यांनी लक्ष दिले असून नावेलीचे प्रश्न विधानसभेत मांडले. सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने मतदारसंघातील पायाभूत सुविधा, वीज आणि पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सरकारी निधीचा वापर केला आहे. आमदार तुयेकर यांच्या कार्यकाळात विकासकामे झाली असली, तरी मतदारसंघाचा मोठा भाग अजूनही भाजपच्या मूळ विचारसरणीशी सुसंगत नाही. त्यामुळे, केवळ विकासकामांच्या जोरावर पुन्हा बहुसंख्य मतदारांना आकर्षित करणे हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान असेल.
एकास एक लढत झाल्यास भाजपला जड
नावेली मतदारसंघात सध्या कमालीची राजकीय उत्सुकता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, या परिसरातून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले होते, जे दर्शवते की विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा केवळ विरोधी मतांच्या फाटाफुटीचा परिणाम होता. सद्यस्थितीत काँग्रेस, आप आणि चर्चिल आलेमाव यांच्यात पुन्हा मतांचे विभाजन झाले, तरच भाजपसाठी ही जागा राखणे सोपे जाईल. मात्र, मतदारांनी किंवा विरोधी पक्षांनी एकमेव मजबूत उमेदवार देण्याचे धोरण अवलंबले, तर विद्यमान आमदार उल्हास तुयेकर यांच्यासाठी ही निवडणूक कठीण ठरेल. सध्या नावेलीतील जनता विकासकामांसोबतच राजकीय स्थैर्याला प्राधान्य देण्याच्या मनःस्थितीत दिसत आहे.

हेही वाचा
सर्व पहा