Home >> ताज्या बातम्या >> पर्यटकाच्या खून प्रकरणात ‘हनी ट्रॅप’मधील महिला; शोध जारी

पर्यटकाच्या खून प्रकरणात ‘हनी ट्रॅप’मधील महिला; शोध जारी

हॉटेलमध्ये गुंगीचे औषध देऊन केली लूट : संशयित महिला कर्नाटकात फरार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd July, 10:45 pm
पर्यटकाच्या खून प्रकरणात ‘हनी ट्रॅप’मधील महिला; शोध जारी

गुजराती व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटल्याचा गुन्हा नोंद असलेली संशयित महिलाच आता उडुपीतील उद्योजक संदीप सुवर्णा यांच्या गूढ मृत्यू प्रकरणातही मुख्य आरोपी ठरली आहे. श्रीमंतांना कॅसिनोमध्ये जाळ्यात ओढून लुबाडण्याच्या या महिलेच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसही चक्रावले असून, तिचा कसून शोध सुरू आहे.

सुवर्णा यांच्या खूनप्रकरणी महिलेवर गुन्हा

उडुपी (कर्नाटक) येथील वॉटर स्पोर्टस् बोट व्यावसायिक संदीप सुवर्णा (४२, रा. मालपे, उडुपी) यांच्या खून प्रकरणी अक्षता उर्फ रूपाश्री सी. या संशयित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला सध्या फरार असून, श्रीमंत व्यक्तींना कॅसिनोमध्ये जाळ्यात ओढून त्यांना हॉटेलमध्ये नेऊन लुटण्याचा तिचा कट असल्याचे तपासात पुढे आले आहे.

कॅसिनोमध्ये आलेल्या श्रीमंत व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून हॉटेलमध्ये नेणे, त्यांना बेशुद्ध करून लुबाडणे आणि हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करणे, अशी या संशयित महिलेची गुन्हेगारी कार्यपद्धत आहे. यापूर्वी गुजरातमधील व्यावसायिक तोमेश यादव यांना अशाच प्रकारे हॉटेलमध्ये बेशुद्ध करून या महिलेने २.४० लाख रुपयांचे दागिने लुटले होते. मात्र, या गुंगीच्या औषधाच्या प्रकारातून यादव बचावले होते. दरम्यान, पणजी पोलिसांतही या संशयित महिलेविरुद्ध चोरीचा आणखी एक गुन्हा नोंद आहे.

गुंगीचे औषध देऊन खूनाचा संशयमृत संदीप सुवर्णा यांचे भाऊ चेतन सुवर्णा यांनी कळंगुट पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित महिलेने हॉटेलच्या खोलीत संदीप यांना गुंगी आणणारा किंवा नशा चढवणारा पदार्थ दिला. त्यानंतर ते बेशुद्ध पडले आणि खोलीतच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, ३०९ आणि १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, मृताच्या गळ्यातील सोनसाखळी आणि पाकीट गायब असल्याने ही चोरी त्याच संशयित महिलेने केल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या दिवशीच ती गोव्यातून कर्नाटकमध्ये पसार झाली असून, तिला अटक करण्यासाठी कळंगुट पोलिसांचे पथक मंगळूरू आणि बंगळूरू येथे रवाना झाले आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिचा शोध सुरू आहे.

रविवार, २८ तारखेला संदीप सुवर्णा हे भाऊ आणि मित्रांसह उडुपीहून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. सोमवारी रात्री ते पणजीतील कॅसिनोमध्ये गेले असता त्यांची संशयित महिलेशी ओळख झाली. मंगळवारी सकाळी दोघे कळंगुटमधील फाल्कन रिसॉर्टमध्ये गेले, तर संदीप यांचे भाऊ आणि मित्र दुसऱ्या हॉटेलमध्ये परतले.

महिला पळून जाताना सीसीटीव्हीत कैद!

१) मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास संशयित महिला रिसॉर्टमधून बाहेर पडताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली.

२) सायंकाळी ६ वाजता संदीप फोन उचलत नसल्याने मित्रांनी रिसॉर्टवर चौकशी केली; मात्र कर्मचाऱ्यांनी खोलीत जाण्यास नकार दिला.

३) रात्री पुन्हा मित्रांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या मदतीने खोली उघडली असता संदीप बेडवर निपचित अवस्थेत आढळले.

वाहनचालक ते मोठा उद्योजक

संदीप सुवर्णा हे १८ वर्षांपूर्वी कर्नाटक सरकारमधील एका माजी मंत्र्यांकडे वाहनचालक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून मालपे येथे वॉटर स्पोर्टस् बोट व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच त्यांनी या व्यवसायात मोठे यश मिळवत उडुपीतील जलक्रीडा क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.