पणजी :गिरीश चोडणकर यांची गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षातील नाराज गटाकडून ‘गोवा काँग्रेस पार्टी’ या नव्या पक्षाची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पक्षाच्या नोंदणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्जही दाखल करण्यात आला असून, या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल शुक्रवारी गोव्यात दाखल होत आहेत.
वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या बैठका
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. दुपारी राजकीय व्यवहार समितीची बैठक होणार असून, त्यानंतर ते प्रदेश कार्यकारिणीला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली.
अमित पाटकर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून गिरीश चोडणकर यांची नियुक्ती झाल्यानंतर काही कार्यकर्ते नाराज आहेत. दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनीही ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे काँग्रेसमध्ये कायम असले तरी, पदावरून दूर झाल्यानंतर ते पक्षाच्या कामकाजात सक्रिय दिसत नाहीत.
अमित पाटकर आणि त्यांच्या समर्थकांमधील नाराजीच्या पार्श्वभूमीवर ‘गोवा काँग्रेस पार्टी’च्या नोंदणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर कोणाला हरकत असल्यास ती ३० दिवसांच्या आत सादर करावी, अशी सूचना जारी करण्यात आली आहे.
फ्रान्सिस्को आंतोनियो जॅसिंटो गोवेया (वेळसाव) हे या पक्षाचे अध्यक्ष असतील. डायना गोवेया (वेळसाव-कासावली, मुरगाव) येथे पक्षाचे कार्यालय असेल. वामन गावकर (मये, डिचोली) हे उपाध्यक्ष, तर रोहिदास गडेकर (सुकूर, बार्देश) हे पक्षाचे सरचिटणीस असतील. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम २९ (ए) अंतर्गत पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला आहे. या पक्षाची नोंदणी झाल्यानंतर काँग्रेसमधील नाराज नेते आणि कार्यकर्ते या पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे.
नव्या पक्षाविषयी मला कोणतीही माहिती नाही. के. सी. वेणुगोपाल हे राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच विधानसभा निवडणुकीच्या रणनितीसाठी गोव्यात येत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक होणार आहे, असे गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.


