Home >> ताज्या बातम्या >> आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे शिकवणी शुल्क माफ

आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे शिकवणी शुल्क माफ

मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजनेला मंजुरी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd July, 09:56 pm
आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे शिकवणी शुल्क माफ

मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजनेला सरकारने मंजुरी दिली असून, याअंतर्गत आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व मुलींचे शिकवणी शुल्क (ट्युशन फी) ऑगस्टपासून पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. आता वार्षिक उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थिनींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती कारागिरी संचालनालयाचे संचालक विनायक कांबळी यांनी दिली.

ऑगस्टपासून ट्युशन फी पूर्णपणे माफ

आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ३०० रुपये प्रक्रिया शुल्क, २,५०० रुपये शिकवणी शुल्क (ट्युशन फी) आणि १,५०० रुपये अनामत रक्कम (डिपॉझिट) भरावी लागते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर १,५०० रुपयांची अनामत रक्कम सर्व विद्यार्थ्यांना परत मिळते, जी यापुढेही तशीच मिळणार आहे. मात्र, नव्या योजनेमुळे आता विद्यार्थिनींना २,५०० रुपयांचे शिकवणी शुल्क भरावे लागणार नाही, असे विनायक कांबळी यांनी सांगितले.

विद्यार्थिनींसाठी मोठा दिलासामुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजनेमुळे आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व मुलींना उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता शिकवणी शुल्क माफ होणार असल्याने कौशल्य शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे.
आधीच्या योजनेपेक्षा वेगळे स्वरूप

यापूर्वी केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत असलेल्या विद्यार्थिनींनाच शिकवणी शुल्क माफ केले जात होते. मात्र, मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजना ही जुन्या योजनेपेक्षा वेगळ्या स्वरूपाची असून, आता उत्पन्नाची अट न ठेवता आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे कारागिरी संचालनालयाचे संचालक विनायक कांबळी यांनी स्पष्ट केले.

```