Home >> ताज्या बातम्या >> ९ वी ते १२ वीच्या पुस्तकांत गोमंतकीय लेखकांना देणार प्राधान्य

९ वी ते १२ वीच्या पुस्तकांत गोमंतकीय लेखकांना देणार प्राधान्य

एससीईआरटीकडून स्पष्ट : बालसाहित्याच्या कमतरतेमुळे बाहेरील लेखकांचे धडे


30th June, 10:46 pm
९ वी ते १२ वीच्या पुस्तकांत  गोमंतकीय लेखकांना देणार प्राधान्य

पत्रकार परिषदेत बोलताना एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर. सोबत सरिता गाडगीळ, अनिल सामंत, सुशांत नाईक आणि रूपेश सावंत. (कैलास नाईक)
..
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : गोव्यातील लेखकांकडून लहान मुलांसाठीचे तयार साहित्य कमी उपलब्ध झाले. इयत्ता ९वी ते १२वीसाठी गोव्यातील लेखकांचे साहित्य मोठ्या प्रमाणात येईल. आता तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांचाही आढावा घेतला जाईल. गेल्या दोन वर्षांपासून पुस्तके तयार करण्याचे काम सुरू आहे, असे स्पष्टीकरण गोवा शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (जीएससीईआरटी)च्या संचालक मेघना शेटगावकर यांनी दिले.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी यावेळी प्रशासन संचालक सरिता गाडगीळ, अनिल सामंत, सुशांत नाईक आणि रूपेश सावंत उपस्थित होते. इयत्ता आठवीपर्यंतच्या मराठी पुस्तकांमध्ये गोव्यातील लेखकांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लेखकांच्या साहित्यावर आधारित धडे व कविता अधिक असल्याबाबत साहित्यिक आणि जाणकारांकडून टीका करण्यात आली होती. त्यानंतर एससीईआरटीने ही भूमिका स्पष्ट केली.
मेघना शेटगावकर पुढे म्हणाल्या, राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरू झाली आहे. गेल्या वर्षी इयत्ता तिसरी आणि सहावीसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली होती. यंदा इयत्ता पहिली, दुसरी, चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीसाठी पुस्तके तयार करण्यात आली आहेत. एससीईआरटीने यंदा एकूण ४१ पुस्तके तयार केली असून त्यापैकी १६ पुस्तके भाषाविषयक आहेत. या प्रक्रियेत १५० शिक्षकांचा सहभाग होता. तसेच संपादक मंडळ आणि परीक्षण मंडळही कार्यरत होते. इयत्ता पहिली ते चौथीच्या पुस्तकांतील मजकूर द्विभाषिक स्वरूपात तयार करण्यात आला आहे. या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह किंवा नैतिकतेला बाधा आणणारा मजकूर नसून ती राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या (एनसीएफ) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि एनईपीच्या आधारे तयार करण्यात आली आहेत.
नव्या पुस्तकांत गोव्यातील लेखकांचे साहित्य अधिक
आम्ही तयार केलेल्या मराठी पुस्तकांचे शिक्षक आणि जाणकारांनी कौतुक केले आहे. पूर्वीच्या मराठी पुस्तकांच्या तुलनेत नव्या पुस्तकांमध्ये गोव्यातील लेखकांच्या साहित्याचा समावेश अधिक आहे. मात्र गोमंतकीय लेखकांनी लिहिलेले बालसाहित्य मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने इतर राज्यांतील लेखकांच्या बालसाहित्याचाही समावेश करावा लागला. पुढे नववी ते बारावीच्या पुस्तकांमध्ये गोमंतकीय लेखकांच्या साहित्याला मोठ्या प्रमाणावर स्थान दिले जाईल, असे अनिल सामंत यांनी सांगितले.
आवश्यक दुरुस्त्या करणार : शेटगावकर

संपादक मंडळातील काही सदस्यांनी आपल्या नातेवाईकांचे तसेच ओळखी-पाळखीच्या व्यक्तींचे साहित्य पाठ्यपुस्तकांसाठी निवडल्याचे आरोप असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना एससीईआरटीने हे सर्व मुद्दे गांभीर्याने लक्षात घेतले असल्याचे शेटगांवकर यांनी सांगितले. आवश्यक त्या दुरुस्त्या पुढे होतील. दोन वर्षांपासून ही पुस्तके तयार करण्याचे काम सुरू असल्याचे शेटगांवकर म्हणाल्या.

विशेष समितीकडून पुस्तकांचे परीक्षण
एससीईआरटी आता इयत्ता नववी ते बारावीची पुस्तके तयार करणार आहे. प्रत्येक पुस्तकाचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली जाईल. पुस्तक तयार झाल्यानंतर ही समिती त्याचा आढावा घेईल. मराठी व कोकणी पाठ्यपुस्तकांच्या परीक्षणासाठी गोवा मराठी अकादमी, गोवा कोकणी अकादमी आणि कोकणी भाषा मंडळ यांच्या प्रतिनिधींचाही समितीत समावेश असेल. कोकणी पुस्तकांमधील व्याकरणविषयक चुका दुरुस्त केल्या जाणार आहेत. व्याकरणाचे निकष कोकणी अकादमीने तयार केल्याप्रमाणे ही पुस्तके तयार करण्यात आली आहेत, असे सुशांत नाईक यांनी सांगितले.