Home >> ताज्या बातम्या >> पक्षांतरामुळे कुंभारजुवे राखण्याचे राजेश फळदेसाईंसमोर आव्हान

पक्षांतरामुळे कुंभारजुवे राखण्याचे राजेश फळदेसाईंसमोर आव्हान

विधानसभेचा आखाडा : कुंभारजुवे

Story: गणेश जावडेकर |
2 hours ago
पक्षांतरामुळे कुंभारजुवे राखण्याचे राजेश फळदेसाईंसमोर आव्हान


विरोधकांमध्ये मतविभागणी झाल्यास होईल भाजपला फायदा
काँग्रेसची उमेदवारी समील वळवईकरांना मिळण्याची शक्यता
निवडणुकीसाठी इच्छुक रोहन हरमलकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

...
पणजी : मागील विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार राजेश फळदेसाई यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कुंभारजुवे मतदारसंघात सध्या तरी भाजपची उमेदवारी राजेश फळदेसाई यांनाच मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून समील वळवईकर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. याशिवाय गोवा फॉरवर्डचे कृष्णा ऊर्फ विठ्ठल परब आणि रोहन हरमलकर हेही इच्छुक आहेत. विरोधकांमध्ये मतविभागणी झाल्यास त्याचा फायदा राजेश फळदेसाई यांना होण्याची शक्यता आहे.


राजेश फळदेसाई
तिसवाडी तालुक्यात पणजी, ताळगाव, सांत आंद्रे, सांताक्रूझ आणि कुंभारजुवे हे पाच मतदारसंघ येतात. या सर्व मतदारसंघांमध्ये ख्रिश्चन मतदारांची संख्या लक्षणीय आहे. सांत आंद्रे मतदारसंघ वगळता उर्वरित सर्व ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि कुंभारजुवे या चार मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे, तर सांत आंद्रे येथे आरजीचा आमदार आहे. कुंभारजुवे मतदारसंघात जुने गोवे, खोर्ली, धुळापी, दिवाडी आणि सांत इस्तेव या भागांचा समावेश होतो. रस्त्यांचे रुंदीकरण, कचऱ्याची समस्या, बेरोजगारी आणि प्रस्तावित बायंगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्प हे या मतदारसंघातील प्रमुख मुद्दे आहेत. खोर्ली औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग बंद आहेत. हे उद्योग पुन्हा सुरू करणे किंवा नवीन उद्योग आणून रोजगारनिर्मिती करणे अपेक्षित असले तरी त्यात आमदार राजेश फळदेसाई यांना अपेक्षित यश आलेले नाही. दिवाडी आणि सांत इस्तेव येथील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी फेरीबोटीने खोर्ली येथे यावे लागते. त्यामुळे या भागात आरोग्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू असले तरी ते अद्याप यशस्वी झालेले नाहीत. गवंडाळी रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून हा पूल लवकर पूर्ण व्हावा यासाठी फळदेसाई प्रयत्नशील आहेत.


पांडुरंग मडकईकर
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जनिता मडकईकर यांचा पराभव करून राजेश फळदेसाई विजयी झाले. त्यानंतर काही आमदारांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्रिपद मिळाले नसले तरी ते पुनर्वसन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता विकासकामांचा हिशेब देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आजपर्यंत काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊन पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या बहुतेक आमदारांना पराभव पत्करावा लागला आहे. त्याला पांडुरंग मडकईकर हे अपवाद ठरले. त्यांनी मगो, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांच्या तिकिटावर विजय मिळवला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले आणि २०२२ मध्ये भाजपने त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी जनिता मडकईकर यांना उमेदवारी दिली. त्यांचा पराभव करून राजेश फळदेसाई मोठ्या फरकाने विजयी झाले. यंदा भाजपकडे फळदेसाई यांच्याएवढा प्रभावी पर्याय नसल्याने त्यांनाच उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित मानले जाते. मात्र पक्षांतरामुळे निर्माण झालेल्या नाराजीला ते कसे सामोरे जातात, यावर त्यांचे यश अवलंबून असेल.


समील वळवईकर
काँग्रेसकडून समील वळवईकर हे संभाव्य उमेदवार म्हणून सक्रिय आहेत. मागील निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी ३,०७२ मते मिळवली होती. तृणमूलचे चिन्ह आणि पक्ष गोव्यात फारसे परिचित नसतानाही त्यांनी चांगली मते मिळवली. काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास ते भाजपसमोर आव्हान उभे करू शकतात.

रोहन हरमलकर
रोहन हरमलकरही इच्छुक
गोवा फॉरवर्डकडून कृष्णा ऊर्फ विठ्ठल परब हेही इच्छुक आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांनी भाजपच्या सिद्धेश नाईक यांना चांगली लढत दिली होती. सध्या काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात युती आहे. मात्र दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिल्यास त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. जमीन अपहार प्रकरणातील संशयित रोहन हरमलकर हेदेखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी ३,८७० मते मिळवली होती. त्यांच्यावर आरोप असले तरी मतदारसंघातील त्यांचा प्रभाव कायम असल्याचे दिसते.
बायंगिणी कचरा प्रकल्प फळदेसाईंना ठरणार डोकेदुखी
बायंगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. जुने गोवे येथील चर्च हा जागतिक वारसा स्थळाचा भाग असल्याने त्याच्या परिसरात कचरा प्रकल्प उभारणे अयोग्य असल्याचा दावा केला जात आहे. आमदार राजेश फळदेसाई यांनीही विधानसभेत या प्रकल्पाला विरोध केला होता. तरीही हा प्रकल्प होणारच, अशी भूमिका कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मॉन्सेरात यांनी घेतली आहे. सध्या हा विषय चर्चेत नसला तरी आगामी निवडणुकीत तो महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. सरकार आणि आमदार दोघेही भाजपचे असल्याने हा प्रकल्प फळदेसाईंसाठी अडचणीचा ठरू शकतो.
विरोधकांची आघाडी झाली तरच भाजपला टक्कर
कुंभारजुवे मतदारसंघात पांडुरंग मडकईकर यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या प्रभावामुळेच भाजपला येथे यश मिळत असे. आता भाजपकडे तितका प्रभावी नेता नसल्याने राजेश फळदेसाई यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र विरोधक एकत्र आले तर फळदेसाई यांच्यासमोर कठीण आव्हान उभे राहू शकते. काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास मतविभागणीचा फायदा फळदेसाईंना होईल. परंतु विरोधकांनी आघाडी केली तर भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

सिद्धेश नाईक

केंद्रीय मंंत्री श्रीपाद नाईक यांंचे सुपुत्र व जिल्हा पंंचायत सदस्य सिद्धेश नाईक हेसुद्धा भाजप उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. खोर्लीहून दोन वेळा जिल्हा पंंचायतीवर निवडून आल्याने त्यांंचाही मतदारसंंघात प्रभाव आहे. कुंभारजुवे मतदारसंंघात भाजप उमेदवारीसाठी ते निश्चितच दावा करतील. तरीही निवडणुकीत त्यांंची भूमिका वा पाठिंंबा महत्त्वाचा ठरणार आहे.