Home >> ताज्या बातम्या >> वाढीव आलेली ७.०५ लाख वीजबिले होणार माफ

वाढीव आलेली ७.०५ लाख वीजबिले होणार माफ

वीजमंत्री ढवळीकर : दुरुस्त करून नवी बिले देण्यास सुरुवात


30th June, 10:41 pm
वाढीव आलेली ७.०५ लाख वीजबिले होणार माफ

पत्रकार परिषदेत बोलताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर. सोबत मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस.
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : विजेचा लोड वाढविल्यामुळे वाढवून आलेली वीजबिले रद्द करण्यात आली आहेत. वीज खात्याने ७.०५ लाख बिले दुरुस्त करण्यास सुरुवात केली असून ग्राहकांना नवी बिले दिली जाणार आहेत. दंड भरलेल्या ग्राहकांची दंडाची रक्कम पुढील बिलातून वजा केली जाईल, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
पणजी येथील विद्युत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस उपस्थित होते.
अनेक वर्षांत विविध बदल झाले, मात्र जुन्या जोडण्यांची क्षमता कोणी तपासली नाही. ‘पॉइंट टू’ योजनेअंतर्गत दोन बल्बसाठी घेतलेल्या वीजजोडणीवर आता मोठी विद्युत उपकरणे वापरली जात आहेत. त्यामुळे निर्माण झालेली तूट दूर करण्याचे काम सुरू आहे. सिंगल फेज वीजजोडणी असलेल्या मीटरसाठी ५ किलोवॅट लोड मंजूर करण्यात आला आहे, तर थ्री फेज जोडणीसाठी १० किलोवॅट लोड मंजूर झाला आहे. त्यापेक्षा जास्त लोड वापरणाऱ्या ग्राहकांनी तीन महिन्यांत ऑनलाईन अर्ज करून लोड वाढवून घ्यावा, अशी घोषणा मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी केली.
सिंगल फेज जोडणी असलेल्या ग्राहकांचा लोड ३ किलोवॅटपर्यंत वाढला असेल, तरी त्यांना अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना ५ किलोवॅटपर्यंत लोड वापरण्याची मुभा असेल. त्यापेक्षा अधिक लोड आवश्यक असल्यास त्यांनी थ्री फेज जोडणी घ्यावी. थ्री फेज ग्राहकांना १० किलोवॅटपर्यंत लोड वापरण्याची मुभा असेल. त्यापेक्षा जास्त लोड आवश्यक असल्यास नव्या कनेक्शनसाठी अर्ज करावा लागेल, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.
लोड मर्यादा ओलांडल्यानंतर वाढीव लोडासाठी ग्राहकांनी तीन महिन्यांच्या आत ऑनलाइन अर्ज करावा. मात्र या तीन महिन्यांच्या कालावधीत कोणताही दंड आकारला जाणार नाही. तीन महिने उलटल्यानंतरही लोड नियमित न केल्यास संबंधितांना नोटीस बजावली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
७० टक्के ग्राहकांना वाढीव बिलांचा फटका
राज्यातील सुमारे ७० टक्के ग्राहकांना लोड वाढविल्यामुळे जादा बिले आली होती. गेल्या आठ महिन्यांतील थकित ७.०५ लाख बिलांवरील ४३.५१ कोटी रुपयांचा दंड माफ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा दंड महसूल वाढविण्यासाठी नव्हे, तर घरांची विद्युत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लावण्यात आला होता. काही घरांमध्ये ०.२५ किलोवॅट क्षमतेची वायरिंग असताना त्यावर १२ किलोवॅटपर्यंतचा भार टाकला जात आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता निर्माण होते, अशी माहिती मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी या महिन्यातच प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. नोव्हेंबरपासून सुमारे आठ महिन्यांच्या कालावधीत लोड वाढविल्यामुळे अनेक ग्राहकांची बिले वाढली होती. ही सुमारे ७.०५ लाख बिले दुरुस्त केली जाणार आहेत. त्यानंतरही बिलांमध्ये त्रुटी आढळल्यास ग्राहकांनी साहाय्यक अभियंत्यांशी संपर्क साधावा. मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली एका वर्षात सर्व त्रुटी दूर केल्या जातील.
_ सुदिन ढवळीकर, वीजमंत्री