गोव्यातील पर्यटन क्षेत्राची आणि एकूणच गोव्याची बदनामी करणाऱ्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आपल्या खऱ्या भूमिकेत यायला हवे. पोलिसांची ही एकट्याची जबाबदारी नाही. सरकार, स्थानिक आमदार, जिल्हा प्रशासन, स्थानिक पंचायत, स्थानिक पालिका, पोलीस या सर्वांनी पर्यटनाच्या विषयावर एकत्र येऊन काय उपाययोजना करता येतील, त्यावर चर्चा करण्याची गरज आहे.

किनारी भागांत पर्यटनाच्या नावाने सुरू असलेल्या गैरप्रकारांविरुद्ध अनेकदा आवाज उठवला जातो. बातम्या येतात. पर्यटकही या विषयी वारंवार सोशल मीडियावर पोस्ट टाकत असतात. कधी किनाऱ्यांवरील टाउट्सचा विषय तर कधी स्पा, मसाज आणि वेश्याव्यवसायावरून होणारी लूट याविषयी पर्यटक हैराण होऊन पोलिसांत तक्रारी करतात, पण दुर्दैवाने असे प्रकार काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. ड्रग्ज, वेश्याव्यवसाय, एस्कॉर्ट सेवा देण्याच्या नावाखाली पर्यटकांना ब्लॅकमेल करून लुटणे, क्लब, पबमध्ये पर्यटकांची होणारी सतावणूक, पर्यटकांना होणारी मारहाण यापासून ते पर्यटकांचे होणारे खून या साऱ्या गोष्टी पर्यटन क्षेत्रात घुसलेल्या गैरप्रकारांचेच परिणाम आहेत. सरकारच्या लक्षात या गोष्टी आल्या किंवा आणून दिल्या, तरीही त्यावर कार्यवाही होत नाही. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाची होणारी बदनामी अजूनही थांबलेली नाही. गोव्यापेक्षा लोक आता केरळ, श्रीलंका, बाली सारख्या ठिकाणांना प्राधान्य देतात अशा बातम्याही राष्ट्रीय प्रसारमाध्यमे देत असतात. गोव्याचे पर्यटन क्षेत्र स्वच्छ करण्याची मोहीम सरकार कधी हाती घेईल याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे, पण तशी शक्यता दिसत नाही. गोव्याच्या पर्यटनात वाढ व्हायला हवी, सुधारणा व्हायला हवी आणि देश-विदेशातील पर्यटकांनी गोव्याकडे आकर्षित व्हायला हवे, तर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची प्रतिमा आधी सुधारायला हवी.
कर्नाटकातील एका पर्यटकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या महिला पसार होणे, या साऱ्या घटनेमुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. मात्र, हा प्रकार नेमका काय आहे, हे शोधण्यासाठी त्याच्या मुळाशी जाऊन पोलिसांनी जे घडले ते सत्य समोर आणायला हवे. ही घटना ताजी असतानाच पोलीस कळंगुट परिसरात कारवाई करून वेश्याव्यवसाय प्रकरणी एकाला अटक करतात. कळंगुट, बागा, कांदोळी आणि हणजूण या परिसरात असे प्रकार नवे नाहीत. रात्रीच्या वेळी तिथली परिस्थिती आणखी भयानक असते, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. क्लब, पबच्या नावाने किनारी भागात सुरू असलेले बेकायदा प्रकार थांबवण्यात पोलिसांना यश येत नाही याचेच आश्चर्य वाटते. किनारी भागात पर्यटकांना ब्लॅकमेल करून लुबाडण्याचे प्रकार नवे नाहीत. अशा अनेक तक्रारी पोलिसांत येतात आणि परस्पर मिटवण्यासाठी नंतर पोलीसही पुढाकार घेतात. त्यामुळे पर्यटक पोलिसांवर विश्वासच ठेवत नाहीत. प्रसारमाध्यमांपर्यंत न येणारी अनेक प्रकरणे परस्पर मिटवली जातात, यात भुर्दंड पडतो तो पर्यटकांना. त्यामुळेच पर्यटक आपल्या राज्यात परत गेल्यानंतर गोव्यात होणारी वेगवेगळ्या प्रकारची लूट समाजमाध्यमांवर पोस्ट करतात आणि यातून गोव्याची प्रचंड बदनामी होते. अर्थात गोव्याची बदनामी करणारे 'पेड इन्फ्ल्यूएन्सर'ही आहेत, पण ते वगळता गोव्याची बदनामी ओढवून घेणारे प्रकार गोव्यात घडतात, ते थांबवण्याची गरज आहे.
कॅसिनोंमुळे गोव्यात रोज पर्यटक येत असतात. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी तर गोव्यात इतर राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली आणि हरयाणा या भागांतून खास कॅसिनोंमध्ये खेळण्यासाठी पर्यटक येतात. त्यांना वेगवेगळी पॅकेजेस देऊन आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातात. त्यातूनही अनेकांची लूट होते. पर्यटक गोव्यात आले की त्यांना एस्कॉर्ट सेवा देण्यासाठी काही जण जाळ्यात ओढून पर्यटकांची फसवणूक करतात. स्पा, मसाजच्या नावानेही पर्यटकांची लूट होते. अशा लोकांवर पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असते, पण एक तक्रार आल्यानंतरही पुढे काही होत नाही, त्यामुळेच पर्यटकांना लुटणाऱ्यांच्या टोळ्याच गोव्यात सक्रिय झाल्या आहेत. यातून फसवणूक तर होतेच, पण पर्यटकांना मारहाण करण्याचेही प्रकार वाढले आहेत. काही वेळा तर पर्यटकांचे खूनही होत आहेत. गोव्यातील पर्यटन क्षेत्राची आणि एकूणच गोव्याची बदनामी करणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आपल्या खऱ्या भूमिकेत यायला हवे. पोलिसांची ही एकट्याची जबाबदारी नाही. सरकार, स्थानिक आमदार, जिल्हा प्रशासन, स्थानिक पंचायत, स्थानिक पालिका, पोलीस या सर्वांनी पर्यटनाच्या विषयावर एकत्र येऊन काय उपाययोजना करता येतील, त्यावर चर्चा करण्याची गरज आहे. यावर वेळीच उपाय झाले नाहीत, तर दरदिवशी होणाऱ्या अशा घटनांमुळे गोव्याच्या पर्यटनाला एक दिवस उतरती कळा लागू शकते.