Home >> विचार >> बार्देश किनारपट्टीला 'फेक कॉल सेंटर'चा विळखा

बार्देश किनारपट्टीला 'फेक कॉल सेंटर'चा विळखा

Story: अंतरंग- उत्तर गोवा |
01st July, 11:38 pm
बार्देश किनारपट्टीला 'फेक कॉल सेंटर'चा विळखा

हल्लीच्या काळात गोव्यात विशेषतः बार्देश तालुक्यात 'फेक कॉल सेंटर' थाटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गोवा हे पर्यटन क्षेत्र असल्याने या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहण्यासाठी आलिशान बंगले, हॉटेल, रिसॉर्ट, व्हिला, फ्लॅट्स सहज मिळतात आणि अशा मोठ्या ठिकाणी असे कॉल सेंटर किंवा इतर सट्टेबाजीसारख्या जुगाराचे सेट-अप करण्यास वाव मिळतो. अमेरिकेसारख्या जागतिक प्रगत देशातील नागरिक हे अशा बनवेगिरीच्या आमिषाला बळी पडतात, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याच लोकांना टार्गेट करतात, हा नवल वाटण्यासारखा प्रकार असला तरी ही सायबर गुन्हेगारी डिजिटलायझेशनसाठी मारक ठरत आहे.  

सध्या बार्देश तालुक्यातील समुद्र किनारपट्टीचाच भाग नव्हे, तर संपूर्ण तालुका हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित झालेला आहे. समुद्र आणि नद्यांनी वेढलेला गावोगावी मोठ्या प्रमाणात पर्यटकांसाठी रिसॉर्ट, हॉटेल आणि बंगले उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांना लुबाडण्याच्या उद्देशाने बेकायदा धंदे सुरू करणाऱ्या गुन्हेगारांना हा तालुका सोयीचा ठरत आहे. त्यातूनच इथे फेक कॉल सेंटर सुरू करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत राज्य पोलिसांकडून अशा अनेक कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एखादी केंद्रीय यंत्रणा किंवा विदेशी लोकांकडून तक्रार आल्यावर स्थानिक पोलिसांकडून या बेकायदा प्रकारावर छापेमारीची कारवाई होते, तोपर्यंत स्थानिक यंत्रणाही डोळेझाक करण्याच्या भूमिकेत असते. परवाच कळंगुट आणि हणजूणमध्ये स्थानिक पोलिसांकडून झालेली कारवाई ही याचाच भाग आहे.

विदेशी विशेषतः अमेरिकन नागरिकांना लुबाडण्यासाठी हे फेक कॉल सेंटर थाटले जात असल्याचे पोलीस कारवाईतून उघडकीस आले आहे. गोव्यातच नव्हे, तर आपल्या देशातील मेट्रो सिटी तसेच इतर भागांत या फेक कॉल सेंटरचे जाळे सुरू आहे.

'आयओएस'चे कस्टमर सर्व्हिस एजंट आणि मेडिकेअर किंवा विमा कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून फेक कॉल सेंटरचे हे सायबर गुन्हेगार अमेरिकन नागरिकांना तांत्रिक मदत, धमकी, कर्ज, त्वरित रोख रक्कम देण्याचे खोटे आमिष दाखवून गिफ्ट कार्ड्स, अॅपल गिफ्ट कार्ड्स आणि क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून लुबाडत असतात. या फेक कॉल सेंटरसाठी हे सायबर गुन्हेगार अमेरिकेतील मोबाईल सिम कार्ड वापरतात. फसवणुकीतून मिळवलेली रक्कम हस्तांतरित करण्यासाठी स्थानिक लोकांमार्फत बँक खाते उघडतात. त्यामुळे अमेरिका ते स्थानिक पातळीवर या सायबर सिंडिकेटचे कनेक्शन असून हे जाळे तोडण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सतर्क आणि सक्षम होण्याची गरज आहे.

- उमेश झर्मेकर