
फोंडा : फर्मागुडी ते ढवळी दरम्यानच्या उड्डाणपुलावर बुधवारी रात्री एक मोठा कंटेनर रस्त्यावर उलटून झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. या उड्डाणपुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अपघातप्रवण ठरलेल्या या उड्डाणपुलावरील धोकादायक वळणावर संबंधित प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
माहितीनुसार, बुधवारी रात्री कुंडईहून मडगावच्या दिशेने जाणारा एक कंटेनर उड्डाणपुलावरून जात असताना हा अपघात घडला. पुलाच्या उतरणीवर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि तो विरुद्ध दिशेला जाऊन थेट रस्त्यावरच पलटी झाला. सुदैवाने, अपघात झाला त्या वेळी सर्व्हिस रोडवर फारशी वाहतूक नव्हती आणि रात्रीची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली.
या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याला तातडीने '१०८' रुग्णवाहिकेतून फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.