Home >> गोवा >> दवर्ली तळेबांधच्या अस्तित्वावर संकट; भू-रुपांतरणाच्या प्रस्तावामुळे गावात निर्माण झाला वाद

दवर्ली तळेबांधच्या अस्तित्वावर संकट; भू-रुपांतरणाच्या प्रस्तावामुळे गावात निर्माण झाला वाद

दवर्लीतील तळ्याच्या जागेचे रुपांतरण रोखणार; आमदार तुयेकरांची ग्वाही

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
58 mins ago
दवर्ली तळेबांधच्या अस्तित्वावर संकट; भू-रुपांतरणाच्या प्रस्तावामुळे गावात निर्माण झाला वाद

मडगाव : दवर्ली तळेबांध येथील तळ्याची जागा दवर्लीतीलच काही लोकांनी विकली असून, मला या व्यवहाराची पुसटशीही कल्पना नव्हती. आता जागा विकत घेतलेल्या व्यक्तीने जमीन रुपांतरणाचा (कन्व्हर्जन) प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, या गोष्टीला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असल्याने आमदार म्हणून मी देखील स्थानिक लोकांच्याच पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे, अशी ग्वाही आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.



दवर्ली तळेबांध येथील तळ्याची जागा भू-रुपांतरणासाठी प्रस्तावित असून, नगरनियोजन विभागाने (TCP) यासंदर्भात जाहीर नोटीस जारी केली होती. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तळ्याच्या जागेच्या रुपांतरणाला जोरदार विरोध दर्शवला आहे. या वादावर अधिकृत भूमिका मांडताना आमदार उल्हास तुयेकर म्हणाले की, हे तळे दवर्लीतील स्थानिक लोकांच्या हक्काचे आहे. सुरुवातीला कुणीतरी या जागेची विक्री केली आणि त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीने ती जागा पुन्हा विकत घेतली. आता या नव्या खरेदीदाराने जमीन रुपांतरणासाठी नगरनियोजन खात्याकडे अर्ज केला आहे. तळ्याच्या अस्तित्वाला धक्का लावणाऱ्या या भू-रुपांतरणाला जनतेचा विरोध आहे, त्यामुळे जनतेचा जो निर्णय असेल तोच माझाही असेल.

या प्रकरणावरून काही लोक आमदार म्हणून आपल्यावर नाहक टीका करत असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. "या जागेच्या खरेदी-विक्री व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही आणि मला त्याची पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती. ही जागा दवर्लीतीलच लोकांनी विकली आहे, आमदार म्हणून मला विचारून हा व्यवहार झालेला नाही. जागा विकत घेणारे व्यावसायिक नियमांनुसार रुपांतरण करत असले, तरी त्याला जनतेचा विरोध आहे. त्यामुळे लोकांच्या भावनांचा आदर करत मी दवर्लीवासीयांसोबतच राहीन," असे आमदार तुयेकर यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा
सर्व पहा