पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधीत चौघांना अटक

नवी दिल्ली : दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या कटाचा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. (Delhi Police's Special Cell has arrested four men from Punjab and Delhi for allegedly planning a terror attack in the national capital on the directions of Pakistan-based ISI handler Shahzad Bhatti.). पाकिस्तानस्थित आयएसआयच्या सूचनेवर काम करणाऱ्या चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शुभदीप सिंह, गुरजंत सिंह, साजन सिंह आणि गगनप्रीत यांचा समावेश आहे. यापैकी तिघे पंजाबमधील असून एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून परदेशी बनावटीची दोन पिस्तुले, नऊ जिवंत काडतुसे आणि पाच मोबाईल फोन जप्त केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर दिल्ली आणि पंजाबमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. सर्वप्रथम अमृतसरमध्ये शुभदीप सिंह याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान शुभदीपच्या चौकशीतून त्याचे साथीदार गुरजंत सिंह आणि साजन सिंह यांचाही सहभाग समोर आला. आणि त्यांनाही पंजाबमधून ताब्यात घेण्यात आले. चौथा आरोपी गगनप्रीत याला दिल्लीतून अटक करण्यात आली.
चौकशीत आरोपी पाकिस्तानमधील हँडलर्सच्या संपर्कात असल्याचे उघड झाले असून, ते परदेशी मोबाईल क्रमांकांचा वापर करून संवाद साधत होते. तसेच ड्रोनच्या माध्यमातून भारतात शस्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
गगनप्रीत याने दिल्लीतील पोलीस ठाणी आणि धार्मिक स्थळांची रेकी केली होती. त्याला राजधानीत गोळीबाराची घटना घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आल्याचा संशय आहे. तर सीमावर्ती तरनतारण जिल्ह्यातील शुभदीप सिंह याच्यावर यापूर्वीही अमली पदार्थांच्या प्रकरणात गुन्हा दाखल होता. त्याच्याकडे ड्रोनद्वारे पाठविण्यात आलेली शस्त्रे आणि अंमली पदार्थ पोहोचत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.
गुरजंत सिंह आणि त्याचा चुलतभाऊ साजन सिंह हे देखील ड्रोनद्वारे पाठविण्यात आलेली शस्त्रे स्वीकारण्याच्या कामात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोघांवरही यापूर्वी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जाळ्यातील इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.