Home >> गोवा >> जीएफडीसीच्या व्यवस्थापनाखालील सर्व धबधबे पर्यटकांसाठी खुले!

जीएफडीसीच्या व्यवस्थापनाखालील सर्व धबधबे पर्यटकांसाठी खुले!

अत्याधुनिक सुरक्षा उपायांसह सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
2 hours ago
जीएफडीसीच्या व्यवस्थापनाखालील सर्व धबधबे पर्यटकांसाठी खुले!

वाळपई : गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे व्यवस्थापित करण्यात येणारे सर्व धबधबे यंदाच्या पावसाळी पर्यटन हंगामासाठी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना आता दूधसागर, पाली (शिवलिंग), चरावणे, नानेली, सावरी आणि मैनापी या निसर्गरम्य धबधब्यांचे मनमोहक सौंदर्य अनुभवता येणार आहे. पर्यटकांचा प्रवास सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी व्हावा यासाठी सर्व धबधब्यांवर सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असून प्रशिक्षित मार्गदर्शक, वन कर्मचारी आणि आवश्यक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष डॉ. देविया राणे यांनी सांगितले की, प्रत्येक पर्यटकाची सुरक्षितता आणि कल्याण हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पावसाळ्यात राज्यातील जंगलांचे आणि धबधब्यांचे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवण्यासाठी आम्ही सर्वांचे स्वागत करतो. मात्र, पर्यटकांनी प्रशिक्षित मार्गदर्शक आणि वन कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालीच पर्यटन करावे तसेच सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे. 

जीएफडीसीकडून धबधब्यांवरील पाण्याची पातळी, पाण्याचा प्रवाह, हवामानातील बदल तसेच परिसरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. परिस्थितीनुसार धबधब्यांवरील प्रवेश नियंत्रित केला जाणार असून, मुसळधार पाऊस, अचानक वाढणारा पाण्याचा प्रवाह किंवा प्रतिकूल हवामान असल्यास काही काळासाठी प्रवेश तात्पुरता बंद करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांनी वन विभाग आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक धबधब्यावर प्रशिक्षित गाईड, वनरक्षक, सूचना फलक, सुरक्षित पायवाटा, धोकादायक भागांवर प्रतिबंधित क्षेत्राची चिन्हे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. गर्दीच्या दिवसांमध्ये पर्यटकांची संख्या नियंत्रित ठेवण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.

सत्तरी तालुक्यातील चरावणे, नानेली, सावरी आणि पाली (शिवलिंग) धबधबे तसेच जागतिक कीर्तीचा दूधसागर धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. याच पार्श्वभूमीवर यंदा सुरक्षित पर्यटनाला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

जीएफडीसीकडून पर्यटकांना सूचना

धबधब्यांमध्ये मद्यपान करून प्रवेश करू नये.

धोकादायक कड्यांवर किंवा दगडांवर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये.

पाण्याच्या प्रवाहात खोलवर उतरू नये.

प्लास्टिक व कचरा जंगल परिसरात टाकू नये.

वन्यजीव आणि पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. 


हेही वाचा
सर्व पहा